WTC Final, India vs Australia: ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2023) च्या अंतिम सामन्याचा आज (11 जून) पाचवा दिवस आहे. आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियासाठी (Team India) अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं (Austrelia) 444 धावांचं लक्ष्य दिलं आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून टीम इंडियानं चौथ्या दिवशी 3 विकेट गमावत 164 धावा केल्या आहेत. आता पाचव्या दिवशी टीम इंडिया ऑस्ट्रेलियानं दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय वेळेनुसार आज सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल. दरम्यान, आज दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे. आज कसोटीचा विश्वविजेता घोषित होणार आहे. 


भारतीय संघाला विजयासाठी अजून 280 धावांची गरज आहे. विराट कोहली (44) आणि अजिंक्य रहाणे (20) हे विजेतेपदाच्या लढतीत आज खेळण्यासाठी मैदानात उतरतील. तर रोहित शर्मा (43), शुभमन गिल (18) आणि चेतेश्वर पुजारा (27) चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात बाद झाले आहेत. कांगारू संघाकडून पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन यांनी आतापर्यंत प्रत्येकी एक विकेट घेतला आहे.


कोहली-रहाणे आणि जाडेजावर संघाची मदार 


टीम इंजियासमोर कांगारूंनी 444 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या लक्ष्याचा पाठलाग करणं टीम इंडियासाठी कठीण आहे, असं म्हणता येणार नाही. कारण यापूर्वीही टीम इंडियानं 400 हून अधिक धावांचं लक्ष्य अगदी सहज पार केलं आहे. WTCच्या अंतिम सामन्यात यावेळी टीम इंडियानं जरी रोहित शर्मा, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या स्टार फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या असल्या तरीदेखील अजुनही टीम इंडियाच्या ताफ्यातील हुकमी एक्के विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजा अजूनही शिल्लक आहेत. जर या तिघांचीही बॅट तळपली तर टीम इंडियासाठी कांगारूंनी दिलेलं लक्ष्य गाठणं फारसं अवघड नसेल. 


पाचव्या दिवशी टीम इंडियाला आणखी 280 धावा कराव्या लागणार आहेत. अशा स्थितीत कोहली-रहाणे आणि जाडेजा यांच्यापैकी एकानंही आपला फॉर्म दाखवला तर टीम इंडियापासून WTC ची ट्रॉफी कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. जाडेजा पाठोपाठ शार्दुल ठाकूरही आहे, ज्यानं WTC कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतक ठोकलं होतं. 






टीम इंडियाचं आतापर्यंतचं सर्वात मोठं लक्ष्य 406 धावांचं 


कसोटी इतिहासातील सर्वात मोठ्या टॉप-7 लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्यांमध्ये टीम इंडियाचं नाव दोनदा सामील झालं आहे. एकदा, 406 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा 6 विकेट्सनी पराभव केला होता. 7 एप्रिल 1976 रोजी टीम इंडियानं हा पराक्रम केला. भारतीय क्रिकेट संघाचे कसोटीतील आतापर्यंतचे हे सर्वात मोठं लक्ष्य आहे. 


यानंतर टीम इंडियाने 11 डिसेंबर 2008 रोजी कसोटी क्रिकेटमध्‍ये दुसऱ्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम केला. त्यानंतर भारतीय संघानं इंग्लंडला हरवलं. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं 6 विकेट्सनी विजय मिळवला होता.


कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या संघांनी केलाय आतापर्यंत सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग?


418/7 : वेस्टइंडीजकडून ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सनी पराभव : 9 मई 2003 
414/4 : साउथ अफ्रीकाकडून ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनी पराभव : 17 डिसेंबर 2008 
406/4 : टीम इंडियाकडून वेस्टइंडीजचा 6 विकेट्सनी पराभव : 7 एप्रिल 1976 
404/3 : ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा 7 विकेट्सनी पराभव : 22 जुलै 1948 
395/7 : वेस्टइंडीजकडून बांग्लादेशचा 3 विकेट्सनी पराभव : 3 फेब्रुवारी 2021 
391/6 : श्रीलंकेकडून जिम्बाब्वेचा 4 विकेट्सनी पराभव : 14 जुलै 2017 
387/4 : टीम इंडियाकडून इंग्लंडचा 6 विकेट्सनी पराभव : 11 डिसेंबर 2008






विजयासाठी टीम इंडियाला 121 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडावा लागणार 


WTC अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. आतापर्यंत लंडनमधील ओव्हल मैदानावर कसोटी सामन्यातील सर्वात मोठं लक्ष्य केवळ 263 धावांचांच पाठलाग करण्याचा आहे. या लक्ष्याचा पाठलाग 121 वर्षांपूर्वी म्हणजे, 1902 मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा 1 विकेटनं पराभव केला होता.


तेव्हापासून आजपर्यंत ओव्हलच्या या मैदानावर हा विक्रम अबाधित आहे. यावेळी भारतीय क्रिकेट संघाला जेतेपद मिळवायचं असेल तर हा विक्रम मोडावा लागेल. 121 वर्ष खूप मोठा कालावधी आहे. यादरम्यान खेळपट्टीत अनेक बदल करण्यात आले आहेत. पण जर टीम इंडियानं ठरवलं तर अजुनही हा विक्रम करण्यापासून टीम इंडियाला कोणीच थांबवू शकत नाही. 


ओव्हलमध्ये कोणत्या संघांनी केलाय आतापर्यंत सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग?


263/9 - इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा 1 विकेटनं पराभव : 11 ऑगस्ट 1902 
255/2 - वेस्टइंडीजकडून इंग्लंडचा 8 विकेट्सनी पराभव : 22 ऑगस्ट 1963 
242/5 - ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा 5 विकेट्सनी पराभव : 10 ऑगस्ट 1972 
226/2 - वेस्टइंडीजकडून इंग्लंडचा 8 विकेट्सनी पराभव : 4 ऑगस्ट 1988