WTC Final 2023 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आहे. 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी 3 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी नाबाद 71 धावांची भागिदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली 44 धावांवर तर अजिंक्य रहाणे 20 धावांवर खेळत होते. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी चांगल्या सुरुवातीनंतर खराब फटका मारत विकेट फेकली. रोहित शर्मा 43 तर चेतेश्वर पुजारा 27 धावांवर बाद झाले. अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 280 धावांची गरज आहे.
भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. याची सर्व जबाबदारी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या खांद्यावर आहे. अखेरच्या दिवशी 280 धावांच्या आव्हानाचा पाठलाग यशस्वी केल्यास भारतीय संघाकडे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गदा येईल. ऑस्ट्रेलियाला सात विकेटची गरज आहे. अखेरच्या दिवशीचा खेळ रोमांचक होण्याची शक्यता आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी मैदानावर आहे.
444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात दमदार झाली. पण शुभमन गिल 18 धावांवर तंबूत परतला. गिल याच्या निर्णायावर वादंग निर्माण झाला. पंचाच्या निर्णायावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. गिल बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि पुजारा यांनी डाव सावरला. पण अर्धशतकी भागिदारीनंतर दोघांनीही विकेट फेकल्या. चुकीचा फटका खेळत दोघेही अनुभवी फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजायासाठी 280 धावांची गरज आहे. तर ऑस्ट्रेलियाला सात विकेटची गरज आहे. सामना निर्णायाक वळणार पोहचलाय.
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत -
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 270 धावांवर घोषित केला. पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान दिले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरी याने सर्वाधिक 66 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाकडून रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर उमेश यादव याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का. मार्नस लाबुशेन याला त्याने तंबूत धाडले. लाबूशन याने 41 धावांचे योगदान दिले. लाबुशेन बाद झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन आणि अॅलेक्स कॅरी यांनी डाव सावरला. दोघांनी दमदार फलंदाजी केली. रविंद्र जाडेजाने ग्रीन याला तंबूत पाठवत भारताला मोठे यश मिळून दिले. पण त्यानंतर कॅरी आणि स्टार्क यांनी भारताची डोकेदुखी वाढवली. कॅरी याने अर्धशतकी खेळी केली. मिचेल स्टार्क 41 धावांवर शमीचा शिकार ठरला. पॅट कमिन्स पाच धावांवर बाद झाला. कर्णधार कमिन्स याने ऑस्ट्रेलियाचा डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा कॅरी याने चोपल्या. अॅलेक्स कॅरी याने 66 धावांची खेळी केली. मिचेल स्टार्क याने 41 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय स्मिथ 34, लाबुशेन 41 यांनीही महत्वाचे योगदान दिले. भारताकडून रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. शमी आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. सिराजला एक बळी मिळाला.