(Source: ECI/ABP News/ABP Majha)
U19 T20 WC: एका मजुराच्या मुलीने भारताला जिंकून दिला वर्ल्ड कप, कोण आहे सोनम यादव?
Sonam Yadav: सोनम यादवने भारताला अंडर-19 महिला टी20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. तिने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजी केली.
Team india Won U19 WC : भारताच्या अंडर-19 महिला क्रिकेट संघाने (Womens Cricket Team India) 29 जानेवारी रोजी टी-20 विश्वचषक जिंकून नवा इतिसाह रचण्यात यश मिळविलं. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने विजेतेपदाच्या अंतिम लढतीत इंग्लंडचा 7 विकेट्स राखून पराभव केला. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच, ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक (Under 19 Womens T20 World Cup) आयोजित करण्यात आला होता, जो जिंकण्यात भारताला यश आलं. विशेष म्हणजे एका सामान्य घरातून आलेल्या सोनम यादवचं भारतीय महिला संघाला विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाचं योगदान होतं. तिने अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात तिच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलं.
कोण आहे सोनम यादव?
सोनम यादव ही फिरोजाबाद जिल्ह्यातील टुंडला गावातील रहिवासी आहे. आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकासाठी महिला संघाची घोषणा झाली तेव्हा सोनम यादवचाही त्यात समावेश होता. ती अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळते. टी-20 विश्वचषकात तिने आपल्या गोलंदाजीतील कामगिरीने सर्वांना खूप प्रभावित केलं. सोनमने वर्ल्ड कपमध्ये 6 सामने खेळले आणि 5 विकेट्स घेण्यात तिला यश आलं. या तर सोनमबद्दल बोलायचं झालं तर सोनमने वयाच्या 13 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. तिचं टॅलेंट पाहून तिचा प्रवेश फिरोजाबादच्या क्रिकेट कोचिंगमध्ये झाला. त्यानंतर तिने आपल्या दमदार खेळामुळे भारताच्या अंडर-19 महिला संघात स्थान मिळवलं.
वडील मजूर म्हणून काम करतात
भारताला अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या सोनम यादवचे वडील अत्यंत साधे असून मजूर आहेत. मुकेश कुमार असं त्याचं नाव असून फिरोजाबादमध्ये एका काचेच्या कारखान्यात ते काम करतात. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सोनम जेव्हा 13 वर्षांची होती तेव्हा तिने क्रिकेटमध्ये रस दाखवला होता. सुरुवातीला ती मुलांसोबत खेळायची. ती तिच्या गोलंदाजीतून तिच्यापेक्षा वयाने मोठ्या खेळाडूंना बाद करायची. यानंतर तिने आणखी मेहनत घेत हे यश मिळवलं आहे.
गावात आनंदाचं वातावरण
भारतीय महिला संघाने अंडर-19 टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर सोनमच्या गावात खूप जल्लोषाचं वातावरण आहे. सोनम आणि तिच्या कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. घरच्या लोकांनीही आनंदाने अक्षरश: उड्या मारल्या. भारतीय संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर सोनमही खूप खूश आहे. ती म्हणाली की ही फक्त सुरुवात आहे. आता राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागणार आहे.
हे देखील वाचा-