ICC Women WC Final: ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने सातव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकत इंग्लडला धूळ चारली आहे. अंतिम सामन्यात या संघाने इंग्लंड संघाचा एकतर्फी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 71 धावांनी जिंकला. यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरली. तिने 138 चेंडूत 170 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. एलिसा ही ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचा खेळाडू मिचेल स्टार्कची पत्नी आहे.


ऑस्ट्रेलियाने 356 धावांची मोठी धावसंख्या उभारली


या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या कर्णधाराचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी रचली. रॅचेल हायनेस 68 धावा करून बाद झाली. त्याच्यानंतर सलामीवीर एलिसा हिली (170) हिनेही बेथ मुनी (62) सोबत 156 धावांची भागीदारी केली. 170 धावा करून एलिसाला अन्या श्रबसोलेने बाद केले. ती आऊट झाली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या स्कोअरबोर्डवर 316 धावा होत्या. यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी संघाला 350 च्या पुढे नेले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 356 धावांची मोठी धावसंख्या उभारली.


ऑस्ट्रेलियाच्या 357 धावांच्या डोंगरासमोर इंग्लंड महिला संघ दडपणाखाली दिसला. अवघ्या 38 धावांत संघाने पहिले दोन विकेट गमावले. तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार हीदर नाइट (26) सोबत नॅट शिव्हर (148) हिने 48 धावांची भागीदारी केली. या धावसंख्येवर कर्णधार नाइट पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर आलेल्या नॅट शिव्हरने संघाची धुरा सांभाळली. मात्र तिला इंग्लड संघातून कोणीही साथ देऊ शकलं नाही. या सामन्यात नॅट शिव्हर 148 धावांवर नाबाद राहिली. संपूर्ण संघ 43.4 षटकांत 285 धावा करून सर्वबाद झाला. हा सामना इंग्लंडने 71 धावांनी गमावला.    


इतर महत्वाच्या बातम्या: 


CSK vs PBKS : चेन्नई विरुद्ध पंजाब लढल, कशी असेल प्लेइंग इलेव्हन? जाणून घ्या...
IPL 2022, GT vs DC : गिल-फर्गुसन विजयाचे शिल्पकार, दिल्लीचा 14 धावांनी पराभव