IPL 2022, GT vs DC : लॉकी फर्गुसनचा भेदक मारा आणि शुबमन गिलच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने दिल्लीचा 14 धावांनी पराभव केला. गुजरातने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने 157 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातने सलग दुसरा विजय मिळवला आहे. गुजरातकडून शुबमन गिलने 84 धावांची खेळी केली तर लॉकी फर्गुसन याने चार विकेट घेतल्या. 


गुजरातने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला निर्धारित 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 157 धावाच करता आल्या. गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना रोखलं. गुजरातच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंत याने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. पतंचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. पृथ्वी शॉ 10, टीम सायफर्ट 3, मनदीप सिंह 18, ललीत यादव 25, रॉमेन पॉवेल 20, अक्षर पटेल 4 आणि शार्दुल ठाकूर 2 यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. 


गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक मारा केली. लॉकी फर्गुसन आणि हार्दिक पांड्या यांनी सर्कलमध्ये दिल्लीच्या तीन फलंदाजांना माघारी झाडले. गुजरातकडून लॉकी फर्गुसन याने चार विकेट घेतल्या. तर मोहम्मद शामीने दोन विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि राशीद खान यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 


दरम्यान, ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला. मात्र, सलामिवीर फलंदाज शुबमन गिल याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 171 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून खलील अहमदने दोन विकेट घेतल्या. तर मुस्तफिजूर रेहमान याने तीन विकेट घेतल्या. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात अतिशय खराब झाली. मॅथ्यू वेड पहिल्याच षटकात माघारी परतला. तर विजय शंकरला मोठी खेळी करण्यात अपयश आले. विजय शंकर फक्त 13 धावांवर बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना गिलने संयमी फलंदाजी केली. हार्दिक पांड्या आणि डेविड मिलरसोबत गिलने महत्वाची भागिदारी केली. पांड्या 31 धावांवर बाद झाला. 


मुस्तफिजूर रेहमानचा भेदक मारा - 
मुस्तफिजूर रेहमान याने भेदक मारा करत गुजरातच्या फंलदाजांना धावा काढण्याची संधी दिली नाही. मुस्तफिजूर रेहमानने पहिल्याच षटकात धोकादायक मॅथ्यू वेडला बाद करत दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. मुस्तफिजूर रेहमानने चार षटकात 23 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या.