Womens U19 T20 WC 2023: भारतीय महिलांची विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक, आता समोर न्यूझीलंडचं तगडं आव्हान
INDW vs NZW U-19 T20 WC: अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघ 27 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
Team India in WC : शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने सुपर सिक्समध्ये करो या मरोच्या सामन्यातश्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं. यापूर्वी सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला होता. आता अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 27 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाचा स्पर्धेतील फॉर्म पाहता या उपांत्य फेरीच्या सामन्यात एक रंगतदार स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली आहे.
यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंड संघ आतापर्यंत अजिंक्य
न्यूझीलंडचा महिला संघ 2023 च्या (New Zealand Team) अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य ठरला आहे. गट सामन्यांपासून सुपर सिक्सपर्यंतचे सर्व सामने जिंकण्यात त्याला यश आले. न्यूझीलंडने इंडोनेशिया, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजच्या महिला संघांचा गट सामन्यात पराभव केला, तर या संघाने सुपर सिक्समध्ये रवांडा आणि पाकिस्तानचा पराभव केला. अशाप्रकारे, न्यूझीलंड संघाने अंडर-19 T20 महिला विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. अशा स्थितीत किवी संघासमोर विजय मिळवून अंतिम फेरी गाठणं भारतासाठी सोपं नसेल.
भारतीय संघाची कामगिरी
अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये (Under 19 Womens T20 World Cup) भारताची कामगिरीही (Team India) देखील चांगली झाली आहे. भारताचा संघ ड गटात होता. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
कधी, कुठे पाहाल सामना?
भारत आणि न्यूझीलंड हा महिला अंडर 19 विश्वचषकातील सामना उद्या अर्थात शुक्रवारी 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत धडक घेणार असल्याने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुपारी 1.30 वाजता दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे खेळवला जाणार आहे.
हे देखील वाचा-