मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू शेफाली वर्माने रविवारी इतिहास रचला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षीय शेफालीने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात डेब्यू केला. यासह ती क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (वनडे, टेस्ट, टी-20) सर्वात कमी वयात खेळणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.
शेफाली वयाच्या 17 वर्ष आणि 150 दिवसांनी तिचा पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. मात्र पहिल्या सामन्यात ती जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकली नाही. ती केवळ 15 धावा करुन बाद झाली. याशिवाय शेफालीने वयाच्या 15 वर्ष 239 दिवसाची असताना पहिला टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तसेच 17 वर्ष आणि 139 दिवसांची असताना तिने कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. शेफालीने आतापर्यंत 22 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने आणि एक कसोटी सामना खेळला आहे. यासह शेफालीने अवघ्या 17 व्या वर्षी आपल्या कामगिरीने क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हेदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शेफाली वर्माने भारताकडून पदार्पण केले तर शिखा पांडे आणि तानिया भाटिया यांनी संघात पुनरागमन केले. त्याचवेळी सोफिया डन्कले इंग्लंडकडून पदार्पण केले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. डेब्यू सामन्यात शेफालीने 14 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 15 धावा केल्या.