Bangladesh tour of West Indies: बांगलादेश क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळल्यानंतर बांगलादेशला वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना काल डॉमिनिकाच्या विंडसर पार्कवर येथे खेळवला गेला. पावसामुळं बांगलादेशच्या फलंदाजीनंतर हा सामना थांबवण्यात आलाय. मात्र, पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी समुद्र प्रवास करताना बांगलादेशच्या खेळाडूंना कोणत्या भीषण परिस्थितीतून जावं लागलं? याचा अनुभव खेळाडूंनी शेअर केलाय. दरम्यान, बांगलादेशच्या एका खेळाडूनं आम्ही मरणाच्या दारातून परतलो, असं म्हटलंय. 


उभय संघातील पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी बांगलादेशचा संघ समुद्री मार्गानं सेंट लुसियावरून डोमिनिकाला पोहोचला होता. हा पाच तासांचा समुद्री प्रवास बांगलादेशच्या खेळाडूंना कधीच विसरता येणार नाही. या प्रवासादरम्यान, बांगलादेशच्या अनेक खेळाडूंच्या तब्येती बिघडल्या. खेळाडू ज्या बोटीतून प्रवास करत होते, ती खूप लहान असल्यामुळं या 6 ते 7फूट उंच लाटांना सामोरं जाणं त्यांच्यासाठी खरच अवघड गोष्ट होती. परिणामी, खेळाडूंना उल्टी आणि इतर त्रास होऊ लागला, अशी माहिती बांगलादेशच्या एका वृत्तपत्रानं दिली. 


बांगलादेशच्या खेळाडूंचा धक्कादायक अनुभव
बांगलादेशच्या एका खेळाडूनं या समुद्री प्रवासादरम्यानचा अनुभव शेअर केलाय. "एक वेळ अशी आली होती की, आम्ही जिवंत राहणार नाही, असं वाटू लागलं. या प्रवासात आम्ही आजारी पडू शकत होतो आणि मरूही शकत होतो." 


पहिल्या टी-20 सामन्यात पावसाची एन्ट्री
वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेल्या बांगलादेशच्या संघाला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 नं पराभव स्वीकारावा लागलाय. यामुळं टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत चांगलं प्रदर्शन करण्याच्या हेतूनं मैदानात उतरेल. पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. बांगलादेशनं 13 षटकात आठ विकेट्स गमावून 103 धावा केल्या आहेत. पावसामुळं हा सामना थाबवण्यात आलाय. उर्वरित सामना आज खेळवला जाणार आहे. 


हे देखील वाचा-