Eng vs India: बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा यष्टीरक्षक आणि युवा फलंदाज ऋषभ पंतनं धमाकेदार फलंदाजी केली. भारतीय संघ अडचणीत दिसत असताना त्यानं संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात पंतनं 111 चेंडूत 146 धावांची खेळी केली. या कामगिरीसह त्यानं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडलाय. 


कसोटीत सर्वात जलद शतक ठोकणारा पहिला भारतीय
बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ऋषभ पंतनं 19 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं 146 धावा कुटल्या. या सामन्यात त्यानं 89 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या कारकिर्दीतील पाचवं कसोटी शतक होतं. या शतकासह त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचं विक्रम आपल्या नावावर नोंदवला. ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद कसोटी शतक झळकावणारा भारतीय यष्टीरक्षक बनलाय. यापूर्वी हा विक्रम एमएस धोनीच्या नावावर होता. धोनीनं 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 93 चेंडूत शतक झळकावलं होतं.


एजबॅस्टनच्या मैदानावरील 120 वर्षांचा विक्रम मोडला
भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे खेळवला जात आहे. 1902 पासून एजबॅस्टन मैदानावर क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत. एजबॅस्टनच्या 120 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एका फलंदाजानं 100 पेक्षा कमी चेंडूत शतक झळकावलंय. या मैदानावर ऋषभ पंत सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर या मैदानावर शतक ठोकणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरलाय. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीनं या मैदानावर शतक झळकावलंय.


ऋषभ पंतच्या कसोटीतील 2000 धावा
ऋषभ पंतने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. या डावात त्यानं 2000 कसोटी धावाही पूर्ण केल्या. यासह तो कसोटीत दोन हजार धावा पूर्ण करणारा जगातील सर्वात तरुण यष्टिरक्षक फलंदाज ठरला. ऋषभ पंत सध्या 24 वर्षाचा आहे.कसोटीत 2000 धावा करणारा तो चौथा भारतीय यष्टिरक्षक आहे. त्याच्या आधी धोनी, सय्यद किरमाणी आणि फारुख इंजिनियर यांनी कसोटीत 2000 धावा केल्या आहेत.


हे देखील वाचा-