Why Samit Dravid Cant Play In 2026 U-19 World Cup : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडची सध्या खूप चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडचा भारताच्या अंडर-19 संघात समावेश करण्यात आला आहे. समित द्रविडची भारतीय अंडर-19 संघात निवड झाली आहे, परंतु 2026 च्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणे त्याच्यासाठी अशक्य आहे. त्यामुळे समितला अंडर-19 वर्ल्ड कप खेळताना पाहणाऱ्या चाहत्यांचे स्वप्न भंगणार आहे.
समित द्रविड का खेळणार नाही अंडर-19 वर्ल्ड कप?
समित द्रविड उजव्या हाताने फलंदाजी करण्यासोबतच मध्यमगती गोलंदाजीही करतो. समित द्रविड 10 नोव्हेंबर रोजी 19 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आणि पुढील 19 वर्षाखालील वर्ल्ड कप 2026 मध्ये झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवला जाणार आहे. 2026 अंडर-19 वर्ल्ड कपपर्यंत समित द्रविडचे वय 20 वर्षांपेक्षा जास्त होईल. या कारणामुळे तो 2026 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. समित द्रविडचा जन्म 10 नोव्हेंबर 2005 रोजी झाला. अष्टपैलू समित द्रविड सध्या बेंगळुरू येथे सुरू असलेल्या KSCA महाराजा टी-20 ट्रॉफीमध्ये म्हैसूर वॉरियर्सकडून खेळत आहे.
21 सप्टेंबरपासून सुरू होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका
ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी अंडर-19 क्रिकेट मालिका 21 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पुद्दुचेरी येथे 21, 23 आणि 26 सप्टेंबर रोजी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व उत्तर प्रदेशचा मोहम्मद अमान करणार आहे. यानंतर चेन्नईमध्ये या दोन संघांमध्ये दोन चार दिवसीय सामने खेळवले जातील. पहिला सामना 30 सप्टेंबरपासून तर दुसरा सामना 7 ऑक्टोबरपासून सुरू होईल. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व मध्य प्रदेशच्या सोहम पटवर्धनकडे असेल.
महाराजा टी-20 ट्रॉफीत समित द्रविडला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. समित द्रविडने 7 डावात 82 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 33 आहे. समित द्रविडला अद्याप या स्पर्धेत गोलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही. मात्र, समित द्रविडने या वर्षाच्या सुरुवातीला कूचबिहार करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करत कर्नाटकला प्रथमच चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने आठ सामन्यांत 362 धावा केल्या आणि जम्मू-काश्मीरविरुद्ध 98 धावांची शानदार खेळी खेळली. याशिवाय त्याने या स्पर्धेत 16 विकेट्स घेतल्या. यामध्ये मुंबईविरुद्धच्या फायनलमध्ये घेतलेल्या दोन विकेट्सचाही समावेश आहे.
हे ही वाचा -
हार्दिक पांड्याचा मुलगा येणार नाही भारतात? नताशासोबत राहून विसरतोय आपल्या मातीला? VIDEO व्हायरल