Shreyas Iyer Buchi Babu Tournament : भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा त्याच्या जुन्या कमकुवतपणाचा बळी ठरला आहे. 29 ऑगस्ट रोजी बुची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळताना अय्यर केवळ 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. खंरतर, बुची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळताना अय्यर शॉर्ट बॉलचा सामना करू शकला नाही आणि पुन्हा एकदा बाद झाला. ही कमजोरी आता त्याच्या कारकिर्दीवर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.
श्रेयस अय्यरच्या कारकिर्दीसाठी धोक्याची घंटा
तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन इलेव्हन (TNCA XI) विरुद्धच्या या सामन्यात श्रेयस अय्यर पुन्हा एकदा शॉर्ट बॉलला बळी पडला, ज्यामुळे त्याची कमजोरी पुन्हा एकदा समोर आली. शॉर्ट बॉलसमोर त्याच्या कमकुवतपणामुळे त्याच्या टीम इंडियातील निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अय्यरच्या या कमकुवतपणाचा विरोधी गोलंदाजांकडून वारंवार फायदा घेतला जातो, विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर, जेथे गोलंदाज अशा कमकुवतपणाचा चांगलाच फायदा घेतात. ही परिस्थिती अय्यरच्या कारकिर्दीसाठी धोक्याची घंटा वाजवत आहे, विशेषत: जेव्हा त्याच्यासाठी भारतीय संघातील स्थान निश्चित करणे महत्त्वाचे असते.
अय्यरच्या कामगिरीवर निवड समितीचे बारीक लक्ष
बुची बाबू स्पर्धा ही श्रेयस अय्यरसाठी महत्त्वाची संधी होती, जिथे तो आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांना प्रभावित करू शकतो. भारत 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असल्याने निवडकर्ता बुच्ची बाबू या स्पर्धेतील अय्यरच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
तामिळनाडूविरुद्ध मुंबईचा दारूण पराभव
या सामन्यात मुंबई संघाला 286 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात संघाचे इतर महत्त्वाचे फलंदाजही अपयशी ठरले. शम्स मुलाणीने 68 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, मात्र तोही मुंबईचा पराभव टाळू शकला नाही. टीएनसीए इलेव्हनने दिलेल्या 509 धावांच्या लक्ष्यापेक्षा मुंबईचा संपूर्ण संघ 223 धावांत ऑलआऊट झाला.
हे ही वाचा -