Who Is Anshul Kamboj : शेतकऱ्याचा मुलगा थेट टीम इंडियात! एका डावात 10 विकेट घेणाऱ्या अंशुल कंबोजचं स्वप्न अखेर पूर्ण, गंभीरचा फोन अन् डेब्यू
England vs India 4th Test Update : भारतीय संघात मँचेस्टर टेस्टमध्ये अंशुल कंबोजला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली.

Who Is Anshul Kamboj : भारतीय संघात मँचेस्टर टेस्टमध्ये अंशुल कंबोजला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. तो काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये पोहोचला होता, आणि लगेचच त्याला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं. माजी विकेटकीपर फलंदाज दीप दासगुप्ता यांनी अंशुलला त्याची टेस्ट कॅप दिली आणि तो भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळणारा 318वा खेळाडू ठरला.
अंशुल कंबोज कोण आहेत? (Who Is Anshul Kamboj)
अंशुल कंबोज हा हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातील इंद्री तालुक्यातल्या फाजिलपूर गावचा आहे. त्याचा जन्म 6 डिसेंबर 2000 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील उधम सिंह हे शेती करतात. अंशुलला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. फक्त सहा वर्षांचा असतानाच घरच्यांनी त्याला क्रिकेट ट्रेनिंग सुरू करून दिली. क्रिकेटसोबत शिक्षणातही भर घालण्यासाठी त्याला ओपीएस विद्यामंदिर शाळेत पाठवण्यात आलं, जेणेकरून त्याचा सराव आणि अभ्यास दोन्ही एकाचवेळी चालू राहतील. अशा प्रकारे अंशुलचा प्रवास एका छोट्या गावातून सुरू होऊन क्रिकेटच्या दिशेने पुढे जात आहे.
Test Cap number 3⃣1⃣8⃣ 🙌
— BCCI (@BCCI) July 23, 2025
Congratulations to Anshul Kamboj, who is all set to make his international Debut! 👏👏
Updates ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/ntZRqsxczF
अंशुल कंबोजचा क्रिकेट प्रवास
अंशुलचा घरेलू क्रिकेटमधला डेब्यू 2022 साली झाला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने 10 सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या आणि आपली छाप पाडली. या कामगिरीच्या जोरावर त्याला 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघात संधी मिळाली. मात्र पुढच्याच हंगामात तो रिलीज झाला. अंशुल कंबोजचं नाव तेव्हा खऱ्या अर्थाने गाजलं, जेव्हा त्याने केरळविरुद्ध एका डावात 10 विकेट्स घेतल्या. हे पराक्रम अनिल कुंबळेनंतर करणारा तो फक्त दुसरा भारतीय ठरला, आणि पहिला भारतीय वेगवान गोलंदाज झाला ज्याने अशी कामगिरी केली.
Shine on, young lad 🙌🙌#TeamIndia #ENGvIND https://t.co/BLDRZz8Gu7
— BCCI (@BCCI) July 23, 2025
महेंद्रसिंग धोनी यांचं मार्गदर्शन
2025 मध्ये अंशुल चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील झाला. इथेच त्याला महेंद्रसिंग धोनी यांचं मार्गदर्शन मिळालं. धोनीशी झालेल्या चर्चेमुळे अंशुलच्या खेळात आणि विचारांत मोठा बदल झाला. तो मैदानावर प्रत्येक फलंदाजासाठी एक खास योजना तयार करून उतरतो, हीच गोष्ट धोनीला खूप आवडली. आर अश्विन यांनीही अंशुलबद्दल मोठं विधान केलं की, “तो भारतातील सर्वात टॅलेंटेड गोलंदाजांपैकी एक आहे. त्याचं प्लॅनिंग बुमराह किंवा झहीर खानसारखं असतं.”
अंशुल कंबोजची आकडेवारी
- फर्स्ट क्लास क्रिकेट – 24 सामने, 79 विकेट्स
- लिस्ट ए क्रिकेट – 40 विकेट्स
- टी-20 क्रिकेट – 34 विकेट्स
अंशुलला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभवही आहे. तो इंडिया ए संघासोबत इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन फर्स्ट क्लास सामने खेळला होता, जिथे त्याने 5 विकेट्स घेतल्या. अंशुल कंबोज आता भारतीय टेस्ट संघाचा भाग बनला आहे. त्याच्याकडून आता मोठ्या आशा आहेत की तो इंग्लंडमध्ये आपलं कौशल्य दाखवत टीम इंडियाचा मॅचविनर ठरेल.
भारतीय संघाची प्लेइंग -11 : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज.





















