हेटमायरचे वादळी अर्धशतक, अर्शदीपच्या तीन विकेट, भारताला विजयासाठी 179 धावांचे आव्हान
West Indies vs India, 4th T20I : शिमरोन हेटमायर याचे अर्धशतक आणि शाय होपची जिगरबाज खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने 178 धावांपर्यंत मजल मारली.
West Indies vs India, 4th T20I : शिमरोन हेटमायर याचे अर्धशतक आणि शाय होपची जिगरबाज खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने 178 धावांपर्यंत मजल मारली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित 20 षटकात 8 विकेटच्या मोबदल्यात 178 धावांपर्यंत मजल मारली. हेटमायर याने 61 तर शाय होप याने 45 धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. भारताकडून अर्शदीप सिंह यशस्वी गोलंदाज ठरला. भारताला विजयासाठी 179 धावांचे आव्हान मिळालेय.
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या षटकांपासून आपले इरादे स्पष्ट केले. पण अर्शदीपने विंडिजच्या इराद्यावर पाणी फेरले. अर्शदीपने दोन्ही सलामी फलंदाजांना झटपट तंबूत धाडले. काइल मायर्स 7 चेंडूत 17 धावा काढून बाद झाला. त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. तर ब्रेंडन किंग 16 चेंडूत 18 धावा काढून बाद झाला. त्यानंतर निकोलस पूरन आणि कर्णधार रोवमन पॉवेल यांचा अडथळा दूर केला. दोघांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. पॉवेल आणि पूरन यांना प्रत्येकी एक एक धाव काढता आली. विंडिजचा डाव ढेपाळणार असेच वाटत होते. पण शाय होप आणि शिमरोन हेटमायर यांनी विंडिजचा डाव सावरला.
4 बाद 57 अशी कठीण परिस्थिती विंडिजची झाली होती. त्यावेळी अनुभवी शाय होप आणि हेटमायर यांनी विडिंजची धावसंख्या वाढवली. पाचव्या विकेटसाठी या दोघांनी 36 चेंडूत 49 धावांची भागिदारी केली. ही जोडी धोकादायक होईल असे वाटत असतानाच चहल याने शाय होप याला तंबूत पाठवले. शाय होप याने 29 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. शाय होप बाद झाल्यानंतर रोमार्ड शेफर्ड आणि जेसन होल्डरही लागोपाठ तंबूत परतले. शेफर्ड याने 6 चेंडूत एका षटकारासह 9 धावांची खेळी केली. त्याला अक्षर पटेल याने तंबूत धाडले. तर जेसन होल्डर याला मुकेश कुमार याने क्लिन बोल्ड केले. होल्डर याला फक्त तीन धावा करता आल्या. शिमरोन हेटमायर याने एकाकी झुंज देत विंडिजची धावसंख्या 170 पार पोहचवली.
शिमरोन हेटमायर याने 61 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने 38 चेंडूत 4 खणखणीत षटकार ठोकले. त्याशिवाय तीन चौकारही मारले. हेटमायर याने ओडियन स्मिथ याच्यासोबत 23 चेंडूत 44 धावांची भागिदारी केली. यामध्ये हेटमायर याने 14 चेंडूत 32 धावा चोपल्या. विंडिजकडून हेटमायर याने सर्वाधिक धावांची खेळी केली. अकिल हुसेन आणि ओडियन स्मिथ यांनी अखेरच्या षटकात धावांची लयलूट केली. स्मिथ याने 15 धावांची खेळी केली.
भारताकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक विकेट घेतल्या. अर्शदीप याने विंडिजच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. कुलदीप यादव याने दोन विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.