आधी विराटची 71वी सेंच्युरी मगच माझं लग्न; चाहत्याची प्रतिज्ञा अखेर पूर्ण, बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल
IND vs NZ: टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे, ज्यामध्ये चाहत्यांची नजर विराट कोहलीवर असेल.
Virat Kohli Century: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. विराट कोहली सध्या धडाकेबाज फॉर्ममध्ये असून श्रीलंकेविरुद्धच्या (INDvsSL) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने दोन शतकं झळकावली आहेत. याआधी विराटने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावलं होतं.
आशिया चषक 2022 पूर्वी विराट फारसा फॉर्मात नव्हता. गेल्या वर्षात त्याला अनेक महिने शतकही झळकावता आलं नव्हतं. त्यावेळी विराटला चौफेर टीकेचा सामनाही करावा लागला होता. पण चाहते ते चाहतेच असतात. ते कधीच साथ सोडत नाहीत. हे कोहलीच्या बाबतीत झालं. त्याच्या पडत्या काळात त्याचे चाहते त्याच्यासोहत होते.
कोहलीचा फॉर्म बिघडल्यानंतर चाहते खूप चिंतेत होते. त्याचवेळी अनेक चाहत्यांनी कोहलीच्या परफॉर्मन्ससाठी प्रार्थना सुरु केली. असाच कोहलीचा एक सच्चा चाहता म्हणजे, अमन अग्रवाल. या पठ्ठ्याने तर कोहलीच्या सेंच्युरीसाठी वेगळाच प्रण केला. जोपर्यंत विराट कोहली त्याचं 71वं शतक पूर्ण करत नाही, तोपर्यंत लग्न करण्याचा विचारही करणार नाही, हे जवळपास अमनने जाहीरच करुन टाकलं. अमनने एका सामन्यावेळी यासंदर्भातील बॅनरही मैदानावर आणला होता.
2023च्या सुरुवातीपासूनच विराट कोहलीने पुन्हा आपली धडाकेबाजी खेळी करत शतकं ठोकली आहेत. आता आपला लाडका विराट पुन्हा फॉर्मात परतल्यामुळे अमनेही आपलं वचन पूर्ण केलं आहे. अमनने माजी कर्णधार विराट कोहलीचा शतकांचा दुष्काळ संपल्यानंतरच आपली लग्नगाठ बांधली. अमन 15 जानेवारीला विवाहबद्ध झाला. विशेष म्हणजे, याच दिवशी विराट कोहलीने आपलं 74 वं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. अमन अग्रवालने लग्नाच्या पोशाखात स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे. अमनने जो फोटो शेअर केलाय त्या फोटोच्या पाठीमागे टीव्हीवर विराट कोहली दिसत आहे.
"I asked for the 71st century but he scored 74th on my special day" ❤️❤️❤️@imVkohli @AnushkaSharma @StayWrogn pic.twitter.com/zHopZmzKdH
— Aman Agarwal (@Aman2010Aman) January 16, 2023
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत विराट कोहलीची नाबाद 166 धावांची खेळी
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने नाबाद 166 धावांची खेळी केली. ही विराट कोहलीची भारतीय मैदानावरील वनडेतील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. कोहलीने फक्त आपला जुना फॉर्मच परत मिळवला नाही तर त्याने त्याच्या शेवटच्या 4 एकदिवसीय डावांपैकी 3 डावांमध्ये शतकं झळकावली आहेत. कोहलीची आता एकदिवसीय सामन्यांमध्ये 46 शतकं पूर्ण झाली आहेत. सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम गाठण्यासाठी कोहलीला आता केवळ तीन शतकं हवी आहेत.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे...
166 धावांच्या खेळीसह विराट कोहलीने घरच्या मैदानावर सर्वाधिक शतकं लगावण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला. कोहलीने घरगुती मैदानावर 21 शतकं लगावली आहेत. सचिन तेंडुलकरपेक्षाही कोहली पुढे असून सचिनने आता 20 शतकं झळकावली होती.
भारत-न्यूझीलंड पहिली वनडे बुधवारी
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 18 जानेवारीपासून सुरु होणार आहे. पहिला सामना 18 जानेवारीला हैदराबादमध्ये होणार आहे. तर दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारीला रायपूरमध्ये आणि तिसरा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाईल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून खेळवले जाणार आहेत.
हेही वाचा