India's most valuable celebrities Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर आणि मैदानाबाहेर चाहत्यांचा आवडता आहे. या खेळाडूचे भारतासह जगभरात चाहते आहेत. विराट कोहलीची गणना सर्वाधिक फॉलो केलेल्या खेळाडूंमध्ये केली जाते. त्याचवेळी, आता विराट कोहली भारतातील सर्वात ब्रँड व्हॅल्यू सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीने शाहरुख खान, सलमान खान आणि रणवीर सिंग यांसारख्या सेलिब्रिटींना मागे टाकले आहे. खरंतर आता बॉलिवूड सेलिब्रिटी असो की क्रिकेटर, विराट कोहलीने सगळ्यांना मागे टाकलं आहे.
शाहरुख-सलमान-रणवीर सगळे मागे राहिले...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 1901 कोटी रुपये झाली आहे. तर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. रणवीर सिंगची ब्रँड व्हॅल्यू 1693 कोटी रुपये आहे. याशिवाय शाहरुख खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाहरुख खानची ब्रँड व्हॅल्यू 1001 कोटी रुपये आहे. वास्तविक, विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये जवळपास 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विराट कोहली सध्या वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे.
आतापर्यंत 2024 च्या टी-20 विश्वचषकात विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मात्र, आयर्लंडशिवाय रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तान आणि अमेरिकेला पराभूत केले आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. भारतीय संघ सुपर-8 फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे विराट कोहली लवकरच आपल्या जुन्या शैलीत परतेल अशी आशा टीम इंडियाच्या चाहत्यांना असेल. आतापर्यंत विराट कोहली तिन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध 4 धावा केल्या. तर आयर्लंडविरुद्ध 1 धाव करता आली. त्याचवेळी अमेरिकेविरुद्ध खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद-
विराट कोहलीने 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तीन सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून एकही चांगली खेळी झाली नाही. याशिवाय 2024 च्या T20 विश्वचषकातील 25 व्या सामन्यात कोहली अमेरिकेविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. याआधी विराट कोहली टी-20 विश्वचषकात कधीही अशा प्रकारे बाद झाला नव्हता.
कोहली टी-20 विश्वचषकातील यशस्वी फलंदाजांपैकी एक-
2012 साली विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात पदार्पण केले होते. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 28 डाव खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 130.52 च्या स्ट्राइक रेटने 1146 धावा केल्या आहेत. या स्पर्धेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 89 धावा आहे. टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. याशिवाय त्याची दोन वेळा सामनावीर म्हणूनही निवड झाली आहे.