T20 World Cup 2024: टी 20 विश्वचषकात सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून भारतीय संघाने सुपर-8 मध्ये एन्ट्री मारली. अमेरिकेच्या 111 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली, परंतु भारताने विजय मिळवला. विराट कोहली (Virat Kohli) व रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या अपयशानंतर रिषभ पंत, सूर्यकुमार यादव व शिबम दुबे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून अमेरिकेला पराभूत केले. तत्पूर्वी, अर्शदीप सिंगने 4 षटकांत 9 धावांत 4 विकेट्स घेऊन विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याच्या भेदक माऱ्यासमोर अमेरिकेला 8 बाद 110 धावा करता आल्या. दरम्यान भारत आणि अमेरिकेच्या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सामना पाहायला आलेले प्रेक्षक विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्माबाबत मजेशीर घोषणा देताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
विराट कोहली जेव्हा क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा मैदानावर उपस्थित असणारे चाहते खूप उत्साहित झाले. यावेळी '10 रुपए की पेप्सी, विराट कोहली सेक्सी....'अशी घोषणा देण्यात आल्या. यानंतर दिवाली हो या होली, अनुष्का लव्ह कोहली, अशा घोषणाही चाहत्यांकडून देण्यात आल्या. यावेळी कोहलीने चाहत्यांना हात दाखवला. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद-
विराट कोहलीने 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तीन सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून एकही चांगली खेळी झाली नाही. याशिवाय 2024 च्या T20 विश्वचषकातील 25 व्या सामन्यात कोहली अमेरिकेविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. याआधी विराट कोहली टी-20 विश्वचषकात कधीही अशा प्रकारे बाद झाला नव्हता.
कोहली टी-20 विश्वचषकातील यशस्वी फलंदाजांपैकी एक-
2012 साली विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात पदार्पण केले होते. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 28 डाव खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 130.52 च्या स्ट्राइक रेटने 1146 धावा केल्या आहेत. या स्पर्धेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 89 धावा आहे. टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. याशिवाय त्याची दोन वेळा सामनावीर म्हणूनही निवड झाली आहे.
टीम इंडिया ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध खेळणार-
टीम इंडियाला शेवटचा साखळी सामना कॅनडाविरुद्ध खेळायचा आहे. भारत आणि कॅनडा यांच्यात होणारा सामना शनिवारी 15 जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे. टीम इंडियाने पहिले तीन सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळले. कॅनडाविरुद्धचा शेवटचा सामना भारतासाठी फारसा महत्त्वाचा ठरणार नाही कारण संघ आधीच सुपर-8 साठी पात्र ठरला आहे.