Virat Kohli Ind vs Aus 5th Test : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने शनिवारी (4 जानेवारी) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये शेवटची इनिंग खेळली, पण त्याची आऊट होण्याची पद्धत बदलली नाही. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय चाहत्यांना कोहलीच्या बॅटमधून शानदार खेळी पाहायला मिळेल अशी आशा होती, मात्र कोहलीने पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली. मालिकेत आठव्यांदा तो ऑफ स्टंपबाहेरील चेंडूवर आऊट झाला. स्कॉट बोलँडने पुन्हा एकदा त्याची शिकार केली. सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात 17 धावा करणारा विराट कोहली दुसऱ्या डावात फ्कत 6 धावा करून बाद झाला. कोहलीचा खराब फॉर्म पाहून बीसीसीआयचे निवडकर्ते आता 'आर की पार'च्या मूडमध्ये दिसत आहेत.
इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी कोहलीच्या भविष्याबद्दल विचार करण्यास सुरुवात केली आहे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. कोहलीला त्याच्या कारकिर्दीबाबत त्याचे मत विचारले जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
संपूर्ण मालिकेत विराट कोहलीसाठी ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू अडचणीचा ठरला. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद 100 धावा केल्या. याशिवाय गाबा कसोटीच्या दुसऱ्या डावातही फलंदाजी झाली नाही. हे दोन्ही डाव सोडले तर कोहली प्रत्येक वेळी यष्टिरक्षकाकडून किंवा स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला. कोहली 36 वर्षांचा झाला आहे. त्याचा फॉर्म खूपच खराब होत आहे. अशा स्थितीत त्याने ऑस्ट्रेलियात शेवटची इनिंग खेळली असण्याची शक्यता आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये कोहलीची कामगिरी
विराट कोहलीसाठी 2024 हे वर्ष कसोटी क्रिकेटसाठी खूप वाईट राहिले होते. धावा करण्यात तो सतत संघर्ष करत आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने 5 सामन्यांच्या 9 डावात 23.75 च्या सरासरीने 190 धावा केल्या. त्याला 5 डावात दुहेरी आकडा पार करता आलेला नाही. त्याने 4 डावात 10 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने 5, 100 नाबाद, 7, 11, 3, 36, 5, 17 आणि 6 धावा खेळल्या. बोलंड व्यतिरिक्त कोहलीला मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी 2-2 वेळा आऊट केले आहे.
तर 2024 मध्ये, त्याने एकूण 19 कसोटी डावांमध्ये फलंदाजी केली आणि 24.52 च्या सरासरीने केवळ 417 धावा केल्या. कोहलीने कारकिर्दीत पहिल्यांदाच इतक्या कमी धावा केल्या आहेत. या काळात त्याला केवळ 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावता आले.
हे ही वाचा -
Rishabh Pant : 6 चौकार, 4 षटकार... ऋषभ पंतने मोडले सर्व रेकॉर्ड! ऑस्ट्रेलियात केली ही खास कामगिरी