Rishabh Pant slams fastest Test Fifty : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत त्याच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. तो कसोटी फॉरमॅटमध्येही टी-20 सारखी फलंदाजी करतो. असेच काहीसे सिडनीच्या मैदानावर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 च्या शेवटच्या सामन्यात पाहायला मिळाले. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने धडाकेबाज अर्धशतक ठोकले. आपल्या खेळीदरम्यान त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि कांगारू गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यादरम्यान त्याने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला.
ऋषभ पंतने ठोकले विक्रमी अर्धशतक
सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंत फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाने 59 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. अशा परिस्थितीत ऋषभ पंतने स्फोटक फलंदाजी करत संघाचे दडपण कमी केले आणि काही वेळातच धावसंख्या 100 धावा पार केली. या सामन्यात पंतने 33 चेंडूत 184.84 च्या स्ट्राईक रेटने 61 धावा केल्या. या खेळीत त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 4 षटकार दिसले. या खेळीत त्याने अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने एका षटकारासह 50 धावांचा टप्पाही पार केला.
यापूर्वी 2022 मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध ऋषभ पंतने 28 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये 150+ च्या स्ट्राइक रेटने दोनदा अर्धशतक झळकावणारा तो जगातील फक्त तिसरा फलंदाज आहे. याआधी केवळ विव्ह रिचर्ड्स आणि बेन स्टोक्स यांनी ही कामगिरी केली होती.
ऋषभ पंतने मोडला एक मोठा विक्रम
ऋषभ पंतने आपल्या स्फोटक खेळीने रेकॉर्ड बुकमध्ये खळबळ उडवून दिली आणि आता त्याने ऑस्ट्रेलियात सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक झळकावण्याचा 50 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. आतापर्यंत हा विक्रम इंग्लंडच्या जॉन ब्राऊन आणि वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेडरिक्सच्या नावावर होता. ब्राउनने 1895 मध्ये मेलबर्नमध्ये 33 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. फ्रेडरिकने 1975 मध्येही याच चेंडूंत अर्धशतक ठोकले होते. अशा प्रकारे पंतने 29 चेंडूत अर्धशतक झळकावून दोघांनाही मागे टाकले आहे.