Virat Kohli Birthday: शतकांचा बादशाह, किंग कोहलीने केलेत अशक्यप्राय विक्रम
Happy Birthday Virat Kohli : भारतीय क्रिकेटसाठी 5 नोव्हेंबर हा दिवस खास आहे. कारण, गेल्या दशकभरापासून कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या कर्णधार विराट कोहलीचा वाढदिवस असतो.
Happy Birthday Virat Kohli : भारतीय क्रिकेटसाठी 5 नोव्हेंबर हा दिवस खास आहे. कारण, गेल्या दशकभरापासून कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या कर्णधार विराट कोहलीचा वाढदिवस 5 नोव्हेंबर रोजी असतो. सध्याच्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी विराट कोहली एक आहे. विराट कोहलीची तुलना नेहमीच सचिन तेंडुलकरसोबत केली जाते. 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत विराट कोहलीचा जन्म झाला होता. गेल्या दशकभरापासून विराट कोहलीनं जागतिक क्रिकेटवर राज्य केलं आहे. या कालावधीत विराट कोहलीनं विक्रमावर विक्रम केले आहेत. विराट कोहलीनं अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. 33 व्या वाढदिवसाला विराट कोहलीच्या विक्रमाची माहिती जाणून घेऊयात...
2008 मध्ये श्रीलंकासंघाविरोधात विराट कोहलीनं एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं होतं. एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगानं 8000, 9000, 10000, 11000 आणि 12000 धावा करणारा फलंदाज आहे. विराच कोहलीनं फक्त 175 डावांत 8000 धावा चोपल्या आहेत. तर 242 डावांत 12 हजार धावांचा टप्पा पार केला होता. 12 हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी सचिन तेंडुलकरला 300 डाव लागले होते. विराट कोहलीनं 58 डाव कमी खेळत हा विक्रम आपल्या नावावर केला.
फक्त वेगानं धावाच नाही तर शतकं करण्यातही विराट कोहलीनं विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहलीला चाहते प्रेमान रनमशीन, किंग कोहली या नावाने ओळखतात. विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 70 शतकं लगावली आहेत. यामधील 41 शतकं कर्णधार असताना ठोकली आहेत, हा विश्वविक्रम आहे. विराट कोहलीनं एकदिवसीय सामन्यात 43 शतकं झळकावली आहेत. यापैकी 35 वेळा भारतीय संघाचा विजय झाला आहे. हाही एक विश्वविक्रम आहे. 2013 मध्ये विराट कोहलीनं फक्त 52 चेंडूत शतक झळकावलं होतं. भारतीय फलंदाजाकडून झळकावलेलं हे सर्वात वेगवान शतक होय.
विराट कोहलीला एकदिवसीय सामन्यात अद्याप एकही द्विशतक झळकावता आलेलं नाही. पण कसोटी सामन्यात विराट कोहलीनं द्विशतकांची रांग लावली आहे. 96 कसोटी सामन्यात विराट कोहलीनं सात द्विशतकं झळकावली आहे. द्विशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. सातही द्विशतकं कर्णधार असाताना झळकावली आहेत, हाही एक विश्वविक्रम आहे. कर्णधारपदाबाबत बोलायचं झाल्यास, आयसीसी चषक जिंकण्यात विराट अपयशी ठरलाय.मात्र, कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर कोहलीनं विराट विक्रम केलाय. विशेषकरुन कसोटी सामन्यात विराट कोहलीनं विक्रमी नेतृत्व केलं आहे. 65 कसोटी सामन्यापैकी भारतीय संघानं 38 सामने जिंकले आहेत.
टी20 क्रिकेटमध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली पहिला फलंदाज आहे. फक्त 86 डावात विराट कोलहीनं हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं विराट कोहलीच्या नावावर आहे. एकदिवसीय, कसोटी आणि टी20 क्रिकेटध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी असणारा विराट जागतिक क्रिकेटमधील एकमेव खेळाडू आहे. विराट कोहलीची टी20 मध्ये 52.01, एकदिवसीय सामन्यात 59.07 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 51.08 सरासरी आहे. विराट कोहलीनं 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्यानं 23 हजार 519 धावा चोपल्या आहेत. या कालावधीत 70 शतकं झळकावली आहेत.