Vaibhav Suryavanshi : 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशीचा इंग्लंडमध्ये कहर! फलंदाजीत 'नापास', पण गोलंदाजीत 'पास', केला अद्भुत विक्रम
राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी नेहमी चर्चेत असतो.

Vaibhav Suryavanshi Bowling Record Youth Test : राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी नेहमी चर्चेत असतो. आयपीएल 2025 मध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतर आता तो इंग्लंडमध्येही आपल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. भारत आणि इंग्लंडच्या अंडर-19 टीम्समधील यूथ वनडे सिरीजमध्ये त्याने 300 हून अधिक धावा केल्या होत्या. आता सुरू असलेल्या यूथ टेस्ट सिरीजमध्ये त्याने गोलंदाजीत एक ऐतिहासिक विक्रम केला आहे.
यूथ टेस्टमध्ये सूर्यवंशीचा ऐतिहासिक विक्रम
सध्या सुरू असलेल्या पहिल्या यूथ टेस्टमध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत 540 धावा केल्या. इंग्लंडकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंग्लंडने 7 गडी गमावत 350 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या सामन्यात सूर्यवंशीने गोलंदाजी करत दोन महत्त्वाचे बळी घेतले. त्याचा पहिला विकेट होता इंग्लंडचा कर्णधार हमजा शेख. विशेष म्हणजे, हा विकेट घेताच वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेट इतिहासात एक वेगळाच विक्रम करणारा खेळाडू ठरला आहे.
सर्वात लहान वयात विकेट घेणारा भारतीय
14 वर्षे आणि 107 दिवस वयात विकेट घेणारा सूर्यवंशी यूथ टेस्ट क्रिकेटमधील सर्वात कमी वयाचा भारतीय गोलंदाज ठरला आहे. आधी हा अद्भुत विक्रम मनीषीच्या नावावर होता, ज्याने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात विकेट घेतल्या. त्याचा एक बळी मार्को जॅनसेन होता, जो आता दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू आहे.
मनीषीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात 58 धावा देत पाच विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात 30 धावा देत दोन विकेट घेतल्या. तसे, पुरुष क्रिकेटमध्ये युवा कसोटीत सर्वात तरुण बळी घेण्याचा विक्रम पाकिस्तानच्या महमूद मलिकच्या नावावर आहे, ज्याने 1994 मध्ये 13 वर्षे आणि 241 दिवसांच्या वयात एक विकेट घेतली होती.
आयुष म्हात्रेचं शतक
भारतीय संघाच्या पहिल्या डावात कर्णधार आयुष म्हात्रे याने चमकदार शतकी खेळी केली. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या म्हात्रेने 115 चेंडूंमध्ये 102 धावा केल्या, ज्यात 14 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. याशिवाय इतर फलंदाजांची कामगिरीही महत्त्वाची ठरली, ज्यामध्ये विहान मल्होत्रा, (67 धावा), अभिज्ञान कुंडू – (90 धावा),राहुल कुमार – (85 धावा) आणि आरएस अम्ब्रीश (70 धावा) या सर्व खेळींमुळे भारताने 540 धावांचा डोंगर उभारला. सूर्यवंशीच्या बॅटमधून मात्र फक्त 14 धावा आल्या. आता भारताची नजर लवकरात लवकर इंग्लंडची फलंदाजी संपवून मोठी आघाडी घेण्यावर आहे. सूर्यवंशीसारख्या खेळाडूच्या कामगिरीमुळे भारतीय संघाला नक्कीच बळकटी मिळत आहे.
हे ही वाचा -




















