India Squad For Mens T20 Emerging Teams Asia Cup 2024 : 18 ते 27 ऑक्टोबर दरम्यान ओमान येथे होणाऱ्या पुरुषांच्या टी-20 इमर्जिंग टीम्स आशिया कप स्पर्धेसाठी भारताने 15 खेळाडूचा संघ जाहीर केला आहे. यजमान ओमानसह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानसह आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू तिलक वर्मा याला इमर्जिंग आशिया कप टी-20 मध्ये भारत अ संघाचा कर्णधार बनवण्यात आला आहे.


अभिषेक शर्माही संघात 


भारतीय मुख्य संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा हा देखील या संघाचा एक भाग असणार आहे, जो बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत चांगली कामगिरी करू शकला नाही. इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत तो सलग दुसऱ्या वर्षी भारत अ संघाचा भाग असणार आहे. अभिषेक गेल्या वर्षी यश धुलच्या नेतृत्वाखालील संघाचा भाग होता, ज्याला अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता.


अनेक युवा खेळाडूंचाही समावेश  


या भारतीय संघात आयपीएल फ्रँचायझींसाठी खेळणारे अनेक युवा स्टार क्रिकेटपटूंचा समावेश आहे. लखनौ सुपरजायंट्सचा फलंदाज आयुष बडोनी, चेन्नई सुपर किंग्जचा स्टार निशांत सिंधू आणि मुंबई इंडियन्सचे बिग हिटर नेहल वढेरा आणि रमणदीप सिंग या संघाचा भाग आहेत. गोलंदाजीत, वेगवान गोलंदाज वैभव अरोरा आणि युवा रसिक सलाम यांचाही संघात समावेश असेल.


टीम इंडियाची नजर दुसऱ्या विजेतेपदावर  


भारताने 2013 मध्ये स्पर्धेच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावले होते, ज्यामध्ये त्याने अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यानंतर संघाला एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. मात्र, 2018 आणि 2023 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला होता. पाकिस्तान आणि श्रीलंका हे इमर्जिंग आशिया कपमध्ये प्रत्येकी दोन विजेतेपदांसह सर्वात यशस्वी संघ आहेत.


इमर्जिंग आशिया कप 2024 साठी भारताचा संघ - तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, निशांत सिंधू, रमणदीप सिंग, अनुज रावत, प्रभ सिमरन सिंग, नेहल वढेरा, अंशुल कंबोज, हृतिक शौकीन, आकिब खान, वैभव अरोरा, रसिक सलाम, साई किशोर, राहुल चहर.


हे ही वाचा -


India Highest T20 Score : 300 धावा हुकल्या, पण विजयादशमीला टीम इंडियाने इतिहास रचला! टी-20 मध्ये केला 'हा' मोठा पराक्रम


Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के