IND vs PAK in T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या  आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघांना एकाच गटात स्थान देण्यात आलंय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सामना होणार आहे. या महामुकाबल्याच्या 9 महिने आधीच पाकिस्तानच्या माजी खेळाडू मोहम्मद हाफीजनं (Mohammad Hafeez) भारताला सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. आगामी टी-20 विश्वचषकात विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहीत शर्मा (Rohit Sharma) यांनी चांगली कामगिरी न केल्यास भारताला पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध संघर्ष करताना दिसेल, असंही त्यानं म्हटलंय. 


रोहित आणि कोहली यांच्या जोडीवर भारतीय संघ अवलंबून असल्याचं हाफिजनं म्हटलंय. संघात चांगले खेळाडू आहेत पण हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या दडपणाच्या सामन्याला सामोरे जाणे चांगले जाणतात. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे अजूनही भारताच्या संघातील सर्वात मोठे खेळाडू आहेत. तर, पाकिस्तानचा संघही प्रगतीपथावर आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला, तर या दोन फलंदाजांनी धावा केल्या नाहीत, तर एवढ्या मोठ्या सामन्याचे दडपण इतर भारतीय खेळाडूंना पेलणं कठीण होईल, असंही मोहम्मद हाफीज म्हणाला आहे. 


मोहम्मद हाफीज सध्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये आशिया लायन्सचं प्रतिनिधित्व करत आहे. या लीगमध्ये भारत महाराजांसह तीन संघ सहभागी झाले आहेत. या लीगमध्ये क्रिकेट चाहत्यांना त्यांचे आवडते माजी खेळाडू पुन्हा एकदा मैदानात क्रिकेट खेळताना दिसत आहेत.


हफीजनं नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषकात तो पाकिस्तान संघाचा भाग होता. गेल्या विश्वचषकात पाकिस्ताननं भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानकडून पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha