वर्ल्डकपमध्ये 5 डावखुरे गोलंदाज, टीम इंडियाला काय करणार?
Left Arm Fast Bowlers : मागील काही वर्षांपासून डावखुरे वेगवान गोलंदाज टीम इंडियाची डोकेदुखी ठरत आहेत.
Cricket World Cup 2023 : मागील काही वर्षांपासून डावखुरे वेगवान गोलंदाज टीम इंडियाची डोकेदुखी ठरत आहेत. 2019 पासून आतापर्यंत डावखुऱ्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. सुरुवातीच्या षटकात आघाडीचे फलंदाज बाद झाल्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामनाही करावा लागला आहे. याची अनेक उदाहरणे तुम्हाला माहित असतील... नुकत्याच झालेल्या विशाखापट्टनम वनडे सामन्यात स्टार्कने आघाडीची फळीला तंबूत पाठवले आहेत. भारतीय संघाविरोधात डावखुरे वेगवान गोलंदाज प्रभावी ठरत असल्यामुळे प्रत्येक संघ एकतरी डावखुरा गोलंदाज संघात ठेवतोय.. 50 षटकांच्या विश्वचषकात टीम इंडियाला या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तीन ते चार वर्ष झाले तरी याची तोड अद्याप मिळालेली नाही. विश्वचषक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपला आहे. अशात भारतीय टीम काय उपाय योजना करणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
सध्या सुरु असलेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱ्या स्टार्कने दोन्ही सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीला अडचणीत टाकले होते. स्टार्कने पहिल्या सामन्यात तीन तर दुसऱ्या सामन्यात पाच विकेट घेतल्या. दोन्ही सामन्यात स्टार्कने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यात सर्वच दिग्गज फलंदाज होते. फक्त स्टार्कच नाहीतर इतरही डावखुरे गोलंदाज टीम इंडियाचे टेन्शन वाढवणार आहेत, यांचा सामना फलंदाज कसा करणार? हे पाहणं औत्सुक्याचे आहे. विश्वचषकात टीम इंडियाची डोकेदुखी ठरणाऱ्या पाच डावखुऱ्या गोलंदाजाबाबत पाहुयात...
मिचेल स्टार्क -
ऑस्ट्रेलियाचा स्टार अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क जगातील सर्वात घातक डावखुऱ्या वेगवान गोलंदाजापैकी एक आहे. स्टार्कने नेहमीच टीम इंडियाला अडचणीत टाकलेय. आताच झालेल्या वनडे सामन्यातही स्टार्कने दिग्गज खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. स्टार्कच्या घातक गोलंदाजीपुढे टीम इंडियाला 120 धावाही करता आल्या नाहीत. अशातच आगामी विश्वचषकात टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा असेल. स्टार्कचा सामना भारतीय खेळाडू कसे करणार? याबाबत क्रीडा चाहते बुचकळ्यात आहेत.
ट्रेंट बोल्ट -
न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याचा जगभरात डंका आहे. ट्रेंट बोल्ट याने जगातील अनेक दिग्गज फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. टीम इंडियाविरोधातही बोल्टची कामगिरी जबरदस्त आहे. विश्वचषकात ट्रेंट बोल्टचा सामना करण्यासाठी टीम इंडियाला रणनिती तयार करावी लागणार आहे.
शाहीन आफ्रिदी -
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या जबरदस्त गोलंदाजी करत आहे. जगातील आघाडीच्या फलंदाजाला त्याने बाद केलेय. भारताविरोधात आफ्रिदी अधिक घातक होतो... दुबईत झालेल्या टी 20 विश्वचषकात तर आफ्रिदीने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले होते.. रोहित-राहुल यांना तर त्याचा चेंडूच समजला नव्हता.. अशात विश्वचषकात टीम इडियाला आफ्रिदीचा सामना करण्यासाठी तयारी करावी लागणार आहे.
सॅम करन -
इंग्लंडचा युवा गोलंदाज सॅम करनही भारताची डोकेदुखी वाढवू शकतो. विशेषकरुन अखेरच्या षटकात सॅम करन अधिक घातक गोलंदाजी करतो. अशात सॅमचा सामना करण्यासाठी टीम इंडियाला रणनिती आखावी लागणार आहे.
मुस्तफिजुर रहमान -
विश्वचषकात बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान टीम इंडियाच्या अडचणी वाढवू शकतो. मुस्तफिजुर रहमान याच्या स्लोअर यॉर्करपुढे जगातील दिग्गजांनी नांगी टाकली आहे. त्याच्या गोलंदाजीपुढे धावा काढणे कठीण आहेच.. पण विकेट वाचवणेही अवघड आहे. त्यामुळे टीम इंडियाला याची तयारी करावीच लागणार आहे.