WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ, IPL मुळे टीम इंडियाची गोलंदाजी बिघडली, नेमकं कारण काय?
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अवघ्या दोन दिवसांत टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. आता सामन्यात कमबॅक करणं भारतासाठी फार अवघड असल्याचं दिसून येत आहे.
WTC Final, India vs Australia : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया (Team India) पुरती संकटात सापडल्याचं दिसून येत आहे. जागतिक कसोटी विजेतेपदाच्या सामन्यात अवघ्या दोन दिवसांत टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. फायनलमध्ये कमबॅक करणं भारतीय संघासाठी फार अवघड असल्याचं दिसून येत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत भारतीय संघाच्या फलंदाजांसह गोलंदाजांनीही निराशा केली आहे. आयपीएल गाजवणारे गोलंदाज वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलमध्ये फोल ठरताना दिसत आहेत.
ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाचे गोलंदाज अडचणीत
सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी विजेतेपद भारताच्या हातातून निसटताना दिसत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली. खेळपट्टीवरील गवत आणि ढगाळ परिस्थितीही भारताच्या बाजूने होती. त्यानंतरही टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांची तुकडी चांगली कामगिरी करु शकली नाही.
IPL मुळे टीम इंडियाची गोलंदाजी बिघडली
ऑस्ट्रेलियाने दीड दिवस फलंदाजी करत 469 धावांपर्यंत मजल मारली. दोन दिवसांच्या सामन्यात टीम इंडियाचे गोलंदाजांचं खास खेळ दाखवू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या फलदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या खराब कामगिरी मागचं कारण आयपीएल असल्याचं क्रिडा समिक्षकांचं म्हणणं आहे.
गोलंदाजांसाठी नियोजन महत्त्वाचं
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या खराब कामगिरी मागचं कारण आयपीएल असल्याचं बोललं जात आहे. बहुतेक भारतीय खेळाडू संपूर्ण दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलमध्ये उतरले आहेत. मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे, केएस भरत, शुबमन गिल आयपीएल फायनल खेळणाऱ्या संघांत सामील होते. इतक्या मोठ्या स्पर्धेनंतर लगेचच खेळाडूंना विश्रांतीशिवाय एवढ्या जागतिक कसोटी विजेतेपदासारख्या मोठ्या सामन्यात उतरावं लागलं. तरीही फलंदाजांसाठी हे तितकं अवघड नाही. पण, गोलंदाजांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे.
IPLनंतर लगेचच WTC फायनलमध्ये उतरले
दोन महिने सलग टी-20 क्रिकेट खेळल्यानंतर लगेचच टीम इंडियाचे गोलंदाज WTC फायनलमध्ये उतरले आहे. गोलंदाजांना टी20 कडून लगेचच कसोटी क्रिकेटकडे वळावं लागलं आहे. गोलंदाजांना आयपीएलच्या 4 षटकांऐवजी आता कसोटी क्रिकेटमधअये लांब स्पेल टाकावा लागता आहे. याच कारणामुळे टीम इंडियाचे गोलंदाज अडचणीत सापडले आहे. काही काळानंतर भारतीय गोलंदाज थकवा दिसून येत असून याचाच फायदा ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी घेतला आहे.