मोहाली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी मोहालीमध्ये सुरु असलेला कसोटी सामना खास आहे. हा विराटच्या कसोटी कारकीर्दीतील शंभरावा सामना आहे. ही मॅच आणखी खास बनवण्यासाठी टीम इंडियाने खास पद्धत अवलंबली. पहिला डाव घोषित केल्यानंतर जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला तेव्हा विराट कोहलीला संघाच्या सदस्यांनी गार्ड ऑफ ऑनर दिला.
भारतीय संघाने मोहाली कसोटीत आपला पहिला डाव 574 धावांवर घोषित केला. यानंतर काही वेळाने भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. टीम इंडियाने मैदानात एन्ट्री घेतली तेव्हा सर्व खेळाडू समोरासमोर उभे राहिले आणि विराट कोहलीला गार्ड ऑफ ऑनर दिला.
विराटनेही खेळीमेळीत एन्ट्री केली आणि सगळ्यांचे आभार मानले. विराटने यानंतर कर्णधार रोहित शर्माला मिठी मारुन थँक्यू म्हटलं. विराट कोहलीला गार्ड ऑफ ऑनर देत असताना मैदानातील वातावरण उत्साही होतं.
Virat Kohli 100th Test: राहुल द्रविडकडून 100व्या कसोटीची कॅप, भावूक विराटकडून जुन्या किश्श्याची आठवण
भारतीय संघाने मोहालीतील कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीचा सन्मान केला होता. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराटला विशेष कॅप सोपवली होती, ज्यावर त्याचं नाव आणि नंबर नमूद होता. या दरम्यान विराटची पत्नी अनुष्का शर्माही मैदानात होती. कसोटी क्रिकेटमध्ये शंभरावा सामना खेळणारा विराट कोहली हा भारताचा बारावा खेळाडू बनला असून जगभरातील 71वा क्रिकेटर ठरला आहे.
विराट कोहलीने मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात 45 धावा केल्या केल्या होत्या. सोबतच त्याने कसोटी कारकीर्दीत 8000 धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीला मागील अडीच वर्षात एकही शतक करता आलेलं नाही. त्यामुळे करिअरमधल्या खास सामन्यात तो शतकांचा दुष्काळ पूर्ण करेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती. पण पहिल्या डावात तो 45 धावांवर बोल्ड झाला.