IND vs SL, 1st Test, Mohali: मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने दमदार खेळी करत शतक पूर्ण केले आहे. सध्या भारताच्या 7 विकेटच्या मोबदल्यात 465 धावा झाल्या आहेत. जडेजा 100 धावांवर खेळत असून त्याच्याबरोबर जयंत यादव खेळत आहे.


भारत आणि श्रीलंकेदरम्यान कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सहा गड्यांच्या बदल्यात 357 धावा केल्या होत्या. काल ऋषभ पंतने सर्वाधिक म्हणजे 96 धावा केल्या होत्या. तर आपला शंभरावा कसोटी सामना खेळत असलेला विराट कोहली 45 धावांवर बाद झाला होता. काल दिवसाचा खेळ संपला त्यावेळी आर अश्विन 10 धावांवर तर रविंद्र जाडेजा 45 धावांवर खेळत होते. काल मयांक अग्रवालनं 33, रोहित शर्मानं 29 तर हनुमा विहारीनं 55 धावांचं योगदान दिलं होतं. तर श्रेयस अय्यर 27 धावांवर बाद झाला होता.


काल टॉस जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाअखेर भारताने 85 षटकांमध्ये सहा गड्यांच्या बदल्यात 357 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक म्हणजे 96 धावा केल्या आहेत. त्याचे शतक केवळ चार धावांनी हुकलं. रोहित शर्माचा कसोटी कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना आहे. रोहित शर्मा भारताच्या कसोटी संघाचा 35 वा कर्णधार ठरला आहे. 


टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कोहलीला काल केवळ 45 धावा करता आल्या, लसिथ एम्बुलडेनियाने बोल्ड केले. दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा भारताचा सहावा खेळाडू आहे. कोहलीने आपल्या 100व्या कसोटीच्या 169व्या डावात 8000 धावा पूर्ण केल्या. याशिवाय 100 व्या कसोटीत आठ हजार धावांना गवसणी घालणारा विराट हा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगनंतरचा दुसराच खेळाडू आहे.