मोहाली : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटीत मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. विराट कोहली शंभरावा कसोटी सामना खेळत आहे. सामना सुरु होण्यासाठी टीम इंडियाने कोहलीचा सन्मान केला आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने विराटला एक विशेष कॅप सोपवली. यावेळी विराट भावूक झाला आणि जुनी आठवण सांगितली.
प्रशिक्षक राहुल द्रविडने विराट कोहलीला विशेष कॅप सोपवल्यानंतर तो म्हणाला की, "शंभराव्या कसोटीची कॅप माझ्या बालपणीच्या हिरोकडून मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझ्याकडे अंडर-15चा तो फोटो आजही ज्यात मी तुमच्यासोबत उभा आणि तुम्हालाच पाहत आहे."
विराट कोहलीने या विशेष प्रसंगी सगळ्यांचे आभार मानले. विराट म्हणाला की, माझी पत्नी इथे आहे. भाऊ स्टॅण्ड्समध्ये बसला आहे, कोच आहेत. आपली टीम इथे आहे, त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसतं." विराट कोहलीला जेव्हा टीम इंडियाकडून ही कॅप देण्यात आली त्यावेळी त्याची पत्नी अनुष्का शर्माही सोबत होती.
विराटने यावेळी बीसीसीआयचेही आभार मानले. "मी फक्त एवढंच सांगेन की आजच्या घडीला आम्ही तिन्ही फॉरमॅट, आयपीएलमध्येही खेळतो. नवी पिढी केवळ हेच पाहू शकते की मी क्रिकेटच्या सर्वात पवित्र फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळलो आहे."
दरम्यान राहुल द्रविडसोबतचा फोटो विराटने शेअर केला होता. ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोबाबत विराटने लिहिलं होतं की, "अशाप्रकारचे क्षण तुम्ही कुठे पोहोचला आहात याची जाणीव करुन देतात. स्वप्न खरी होतात असं मला वाटतं."