टीम इंडियाने विश्वचषक टी-20 स्पर्धेतील (T20 World cup) पहिल्याच हंगामात धमाकेदार कामगिरी करत विश्वविजयाचा मान पटकावला होता. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारताने 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकप उंचावला. त्यानंतर, भारताला विश्वचषक जिंकता आला नाही. यंदाच्या 2024 च्या टी-20 वर्ल्डकप सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया पुन्हा विश्विवजयाचे स्वप्न घेऊन मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने (BCCI) टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यामध्ये, कर्णधार पदाची धुरा रोहित शर्माकडे सोपविण्यात आली असून हार्दीक पांड्याला उपकर्णधार बनविण्यात आले आहे. मात्र, आयपीएल (IPL) आणि टी-20 सामन्यात अफलातून फलंदाजी करुन क्रिकेटप्रेमींच्या मनात घर केलेल्या रिंकु सिंगला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे, सोशल मीडियातून त्याचे चाहते व क्रिकेटप्रेमींची नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून येते.
टी-20 विश्वचषक स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होत असून रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जच्या शिवम दुबेला भारतीय संघात संधी मिळआली आहे. गुणवत्ता आणि कामगिरी या दोन्ही आघाड्यांवर सरस ठरुनही आतापर्यंत फारशी संधी न मिळालेल्या संजू सॅमसनलाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. तर, चहलची टीमवापसी झाली. तर शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान यांचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे, रिंकू सिंहला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्याने सोशल मीडियातून आश्चर्य व्यक्त होत आहे. तर, रिंकूच्या चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
इरफान पठाणचे ट्विट
टीम इंडियाचा माजी जलगती गोलंदाज इरफाण पठाण यानेही ट्विट करुन रिंकू सिंहला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड करताना रिंकू सिंहच्या अलीकडच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे ट्विट इरफान पठाणने केले आहे. इरफानने एकप्रकारे रिंकू सिंहला संधी न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केल्याचं दिसून येत. रिंकूला पहिल्या 15 मध्येही स्थान मिळालं नसून राखीव खेळाडूंमध्ये रिंकूची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, सोशल मीडियातही रंगली चर्चा आहे.
दरम्यान, रिंकू सिंहला संधी न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कोलकाता नाईट रायडर्समधून आपल्या अफलातून फटकेबाने रिंकू क्रिकेटप्रेमींच्या मनात घर केलं आहे. बिग फिनीशर म्हणून रिंकू नावारुपाला आला असून शाहरुख खाननेही त्याच्या खेळाचं कौतुक केलंय. मात्र, रिंकूला टी-20 विश्वचषकात संधी न मिळाल्याने सोशल मीडियातूनही नेटीझन्स प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा