Hardik Pandya T20 World Cup 2024 : आगामी टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची आज घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियात हार्दिक पांड्याला मोठी जबाबदारी दिली आहे. हार्दिक पांड्याला टीम इंडियाचं उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्या खराब फॉर्ममध्ये आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तरीही बीसीसीआयने हार्दिक पांड्यावरील विश्वास कायम राखला आहे. आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे हार्दिक पांड्या ट्रोल झाला होता. आता विश्वचषकासाठी संघाची घोषणा झाल्यानंतरही हार्दिक पांड्या ट्रोलर्सच्या निशाण्यावरच आहे. लखनौविरोधातील सामन्यातही हार्दिक पांड्याला मोठी खेळी करता आली नाही. 27 धावांवर मुंबईचे तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानावर आला. पण नवीन उल हकच्या चेंडूवर गोल्डन डक झाला. हार्दिक पांड्याला खातेही उघडता आले नाही. कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी पांड्याकडून अपेक्षित होती, पण त्याला अपयश आले. त्यामुळे हार्दिक पांड्या ट्रोल होतोय. 


आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे, तो संघाचा उपकर्णधारही आहे. पण हार्दिक पांड्याला अद्याप फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक पांड्याला नऊ सामन्यात 197 धावा करता आल्या. त्याशिवाय गोलंदाजीत फक्त चार विकेट घेता आल्या. गोलंदाजीमध्ये धावाही रोखता आल्या नाहीत. हार्दिक पांड्याआधी रोहित शर्मा मुंबईच्या संघाचा कर्णधार होता. पण यंदा ही जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली. पांड्याला त्यामुळेही ट्रोलर्सचा सामना करावा लागला. त्याशिवाय कामगिरीतही तो फ्लॉप गेलाय. तरीही बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर विश्वास दाखवलाय. 






पांड्याला टीम इंडियात मोठी जबाबदारी -


हार्दिक पांड्याला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळण्याची अनेक कारण आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्यानं दमदार प्रदर्शन केलेय. पांड्याचा अनुभव भारतासाठी फायदाचा ठरेल. आयसीसी स्पर्धेमध्ये खेळण्याचा पांड्याकडे मोठा अनुभव आहे. त्यानं अनेकदा मॅच विनिंग खेळी केल्या आहेत. त्यामुळेच पांड्यावर बोर्डानं विश्वास दाखवत उपकर्णधारपद सोपवलं आहे. 


पांड्याचं आंतरराष्ट्रीय करिअर -


हार्दिक पांड्यानं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये त्यानं प्रभावी कामगिरी केली आहे. पांड्याने 92 सामन्यात 1348 धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय 73 विकेटही घेतल्या आहेत.