T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अफलातून कामगिरी केली होती. भारताने सगल 10 सामने जिंकत जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाकडे वळवल्या होत्या. त्यात, कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक झालं. मात्र, अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार रोहित शर्मासह कोट्यवधी भारतीयांचे डोळे विश्वविजयातील अंतिम सामन्यात पाणावले होते. मात्र, आता पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया विश्वविजयाचे स्वप्न घेऊन मैदानात उतरणार आहे. त्यामुळे, रोहित शर्मा गत टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढून भारताला विश्वचषक मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 


1 जूनपासून टी-20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होत आहे. त्यासाठी, बीसीसीआयनं आज टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा केली. त्यामध्ये, रोहित शर्माकडेच संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे, गत 2023 मधील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम रोहित पुन्हा सज्ज होणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या माध्यमातून रोहितच्या संघात रोहित शर्मासह यशस्वी जायस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना टॉप ऑर्डरचे फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना विकेटकीपर म्हणून निवडण्यात आले आहे. तर, दुबे यालाही संधी देण्यात आली आहे. गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि कुलदीप यांना संधी दिली आहे.


टीम रोहितच्या नेतृत्वात भारत पुन्हा एकदा विश्वचषकाच्या मैदनात उतरणार असून 2023 च्या विश्वचषकातील दैदिप्यमान कामगिरीनंतरही अंतिम सामन्यात पराभव स्वीकारा लागल्याने निराश झालेल्या कोट्यवधी भारतीयांना पुन्हा विश्वविजय पाहण्याची संधी मिळाली आहे. 


पराभवानंतर मोदींनी दिला होता धीर


2023 च्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत झाली होती. या सामन्यात 6 विकेटने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्याची संधी रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारताने गमावली होती. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 241 धावा काढल्या होत्या. त्यानंतर, 241 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघालाही पहिल्या 10 षटकात चांगलेच धक्के बसले होते. मात्र, ऑस्ट्रेलियने फलंदाज  ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा झाला. कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले. कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघही निराश झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: ड्रेसिंग रुममध्ये येऊन भारतीय संघाली धीर देण्याचा प्रयत्न केला होता. मोदींचे ते व्हिडिओही चांगलेच व्हायरल झाले होते. 


आता, पुन्हा एकदा रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया जगजेत्ता होण्यासाठी जून महिन्यात मैदानावर उतरणार आहे. यंदा सामना टी-20 विश्वचषकाचा असणार आहे. मात्र, 140 कोटी भारतीयांना पुन्हा एकदा रोहितच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकायचा असून एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढायचा आहे. त्यासाठी, टीम रोहित अन् टीम इंडिया सज्ज झालीय. 


2007 मध्ये भारताने जिंकला वर्ल्डकप


भारतीय संघाने 2007 मध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर, भारताला टी-20 विश्वचषक जिंकता आला नाही. गत 2022 मध्ये इंग्लंडच्या संघाने टी-20 विश्वचषक जिंकून दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला आहे. तर, भारत यंदा टी-20 च्या दुसऱ्या विश्वविजयासाठी पहिल्यांदाच रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे.