T20 World Cup : टीम इंडियाचं वर्ल्डकपमधून पॅकअप; सेहवागकडूनही कोपरखळी, पाकिस्ताननंही साधली संधी
T20 World Cup : टीम इंडियाच्या यंदाच्या विश्वचषकावर नाव कोरण्याच्या आशा मावळल्या आहेत. यावरुन नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन टीम इंडियावर मीम्सचा पाऊस पाडला आहे.
T20 World Cup : टी-20 विश्वचषकातील 40 व्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं अफगाणिस्तानच्या संघाला धुळ चाखली आणि टीम इंडियाचं पॅक अप झालं. टीम इंडियाचं विश्वचषकावर नाव कोरण्याचं यंदाचं स्वप्न भंगलं. टीम इंडिया विश्वचषकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. काही फॅन्स सोशल मीडियावरुन टीम इंडियाला ट्रोल करत आहेत. यामध्ये माजी क्रिकेटर विरेंद्र सिंह सेहवागचाही समावेश आहे. सेहवागनंही टीम इंडियाला कोपरखळी मारली आहे. सेहवागनं एक मीम शेअर करत लिहिलं आहे की, 'खतम, बाय-बाय, टाटा, गुड बाय'
नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस
पाकिस्तान सरकारमधील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री हुसैन यांनीही एक ट्वीट करत टीम इंडियाला ट्रोल केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "जर टीम इंडियानं नामिबियाला 3 ओव्हर्समध्ये पराभूत केलं, तर ते लवकरच एअरपोर्टवर पोहचू शकतात."
भारताची निराशाजनक कामगिरी
यंदाच्या विश्वचषकात भारताची कामगिरी निराशजनक राहिली आहे. साखळी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला होता. तेव्हाच भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता. पहिल्या दोन पराभवानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून होता. मात्र, न्यूझीलंड संघानं दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. आज, भारत आणि नामिबिया यांच्यामध्ये अखेरचा साखळी सामना रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी :
- 24 ऑक्टोबर : पाकिस्तानकडून 10 विकेटनं पराभव
- 31 ऑक्टोबर : न्यूझीलंडकडून 8 विकेटनं पराभव स्विकारला
- 3 नोव्हेंबर : अफगानिस्तानला 66 धावांनी हरवलं
- 5 नोव्हेंबर: स्कॉटलँडचा 8 विकेटनं पराभव केला
- 8 नोव्हेंबर : नामिबियाविरोधात आज लढत
अफगाणिस्तानचा पराभव, न्यूझीलंडची सेमीफायनलमध्ये धडक
टी-20 विश्वचषकातील 40 व्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं अफगाणिस्तानच्या संघाला धुळ चाखली. अबुधाबीच्या शेख जायद स्डेडिअमवर (Sheikh Zayed Stadium) खेळण्यात आलेल्या सामन्यात आफगाणस्तानच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अफगाणिस्तानचा हा निर्णय फसला. अफगाणिस्तानच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 124 धावापर्यंत मजल मारता आली. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं अफगाणिस्तानवर 8 विकेट्स राखून विजय मिळवलाय. न्यूझीलंडच्या विजयामुळं भारताचं उपांत्य फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलंय. तर, या विजयासह न्यूझीलंडच्या संघाने उपांत्य फेरीत धडक दिलीय.
नाणेफेक जिंकून अफगाणिस्ताकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हजरतुल्ला जजई (4 बॉल 2 धावा), मोहम्मद शहजाद (11 बॉल 4 धावा), रहमानउल्ला गुरबाज (9 बॉल 6 धावा), नजीबुल्ला जद्रान (48 बॉल 73 धावा), गुलबदिन नायब (18 बॉल 15), मोहम्मद नबी (20 बॉल 14), करीम जनात (2 बॉल 2 धावा), रशीद खान (7 बॉल 3 धावा) आणि मुजीब उर रहमान 1 बॉल 0 धाव केली. ज्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 124 धावापर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडच्या संघाकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्यात. तर, टीम साऊथीला दोन आणि अॅडम मिल्ने, मिचेल सँटनर आणि ईश सोडी यांना प्रत्येकी एक- एक विकेट्स मिळाली.