बारबाडोस : भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2024) सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG ) यांची टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8 मध्ये लढत 20 जूनला होणार आहे. या मॅचपू्र्वी रोहित शर्माचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. बारबाडोसमध्ये नेटमध्ये फलंदाजी करताना आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जखमी झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झाली आहे. मात्र, फिजिओच्या सल्ल्यानंतर देखील सूर्यकुमार यादवनं फलंदाजी सुरु ठेवली. सूर्यकुमार यादवनं दुखापत झालेल्या ठिकाणी मॅजिक स्प्रे मारुन फलंदाजी सुरु ठेवली. सूर्यकुमार यादवला झालेली दुखापत किती गंभीर आहे. यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. 


सूर्यकुमार यादव टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा महत्त्वाचा फलंदाज आहे. सूर्यकुमार यादव आयसीसी टी20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादवनं अमेरिकेविरुद्ध अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळं सुपर 8 मधून सेमीफायनलमध्ये जायचं असल्यास सूर्यकुमार यादवची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळं सूर्यकुमार यादवला झालेली दुखापत अधिक गंभीर असू नये, अशी अपेक्षा टीम इंडियाचे चाहते करत आहेत. 
 
भारतानं सोमवारी सकाळी सराव सत्रात सहभाग घेतला. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहलीसर सर्व खेळाडू सहभागी झाले होते. बारबाडोसमधील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न भारताच्या खेळाडूंनी केला. 


भारत आणि कॅनडा यांच्यातील अखेरची लढत पावसामुळं वाया गेली. आयसीसीला पावसामुळं ती मॅच रद्द करावी लागली. भारतानं ग्रुप स्टेजमधील तीन विजयासह सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारताची पहिली मॅच अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. 20 जूनला भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने येतील.    


भारताच्या सुपर 8 मधील लढती?


भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश सुपर 8 मध्ये एका गटात आहेत. भारताची पहिली मॅच 20 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. भारत आणि बांगलादेश मॅच 22 जूनला होईल. तर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच 24 जूनला होईल. 


भारताकडे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी 


भारतानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं होतं. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं विजेतेपद मिळवलं होतं. यानंतर पुढच्या सात टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवता आलेलं नाही. याशिवाय गेल्या 10 वर्षांपासून भारताला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवता आलेलं नाही. सुपर 8 मधील दोन मॅच जिंकल्यानंतर भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळं भारत यावेळी टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 


संबंधित बातम्या : 


WI vs AFG : वेस्ट इंडिजनं एका ओव्हरमध्ये काढल्या 36 धावा, ओमरझाईची टी वर्ल्ड कपमधील सर्वात महागडी ओव्हर


Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनने इतिहास रचला!