Babar azam : टी20 विश्वचषकानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये हाहा:कार माजला आहे. साखळी सामन्यातच पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर खेळाडूंवर टीकेची झोड उडत आहे. त्याशिवाय खेळाडूमध्ये अंतर्गत कलह असल्याच्या बातम्याही समोर येत आहे. त्याशिवाय बाबर आझमच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात येत आहेत. बाबर आझम याला कर्णधारपदावरुन काढण्याची मागणी कऱण्यात येत आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंकडून बाबर आझम याच्यावर टीकेची झोड उडवली जात आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अली यानेही जोरदार टीका केली आहे. बाबर आझम याने मोहम्मज आमिर (Mohammad Amir)  याचा वार करत शाहीन आफ्रिदीवर (Shaheen Afridi) दबाव टाकल्याचा दावा बासित अली यानं केला आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये फूट पडल्याचं कोच गॅरी कस्टर्न यांनी सांगितल्याचा दावाही स्थानिक वृत्तपत्राने केलाय. 


पाकिस्तानचे खेळाडू दोन गटामध्ये विभागले गेले आहेत, खेळाडूंमध्ये उभी फूट पडल्याचं समोर आले होते. पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम यानं बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याचं म्हटले होते. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चर्चा जगभरात सुरु झाली होती. आता यामध्ये बासित अली याची भर पडली आहे.  बासित अलीच्या दाव्यानुसार, "बाबरने चुकीच्या हेतूने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) मोहम्मद आमिरचा टी-20 विश्वचषक 2024 च्या संघात समावेश करण्यास भाग पाडले. शाहीन आफ्रिदीवर दबाव टाकण्यासाठी बाबरने मोहम्मद आमीर याला संघात घेतले."  निवड समिती चुकीच्या व्यक्तीच्या हातात आहे. आवडीच्या खेळाडूंनाच निवडकर्ते संघात स्थान देतात. त्यामुळे चांगल्या खेळाडूचं नुकसान होत असल्याचा दावाही बासित अली याने केला आहे. दरम्यान, मुख्य निवडकर्ते वहाब रियाझ आणि बाबर आझम यांच्यातील वादही सध्या चर्चेचा विषय आहे.


बाबर-शाहीनमध्ये वाद - 


विश्वचषक 2024 आधीपासूनच पाकिस्तान संघामध्ये ड्रामा सुरु आहे. 2023 वनडे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबर आझम याला कर्णधारपदावरुन हटवलं होतं. त्यानंतर टी20 संघाची धुरा शाहीन आफ्रिदीकडे सोपवली होती. पण टी20 विश्वचषकाआधी पुन्हा एकदा पाकिस्तान संघामध्ये नेतृत्व बदल कऱण्यात आला. शाहीन आफ्रिदीच्या जागी बाबर आझम याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले. यावरुन दोघांमध्ये आधीच मतभेद सुरु होते. त्यात विश्वचषकात संघाची खराब कामगिरी झाली. त्यामुळे दोन्ही खेळाडूमधील दुरावा आणखी वाढला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबर आणि शाहीनमध्ये मोठा वाद सुरू आहे. हे दोघे एकमेकांशी बोलत नाहीत.  


विश्वचषकातील पाकिस्तानची कामगिरी - 


अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तान संघाला चार सामन्यात दोन पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिका आणि भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानला दुबळ्या कॅनडा आणि आयर्लंडविरोधात विजय मिळवता आला. आयर्लंडविरोधातही पाकिस्तानचा विजय रडतखडतच झाला.