Lockie Ferguson In T20 WC 2024 : टी20 क्रिकेटमध्ये नव्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. कुणी विचारही केला नसेल, असा विक्रम न्यूझीलंडच्या लॉकी फर्गुसनच्या नावावर झाला. पापुआ न्यू गिनी संघाविरोधात लॉकी फर्गुसन यानं चार षटकं निर्धाव फेकण्याचा पराक्रम केला आहे. लॉकी फर्गुसन यानं चार षटकं निर्धाव फेकत तीन विकेट घेतल्या आहेत. टी20 क्रिकेटमधील ही सर्वात भेदक गोलंदाजी म्हणून नोंद झाली आहे. कसोटी खेळणाऱ्या देशातील कोणत्याही गोलंदाजाला आतापर्यंत असा पराक्रम करता आलेला नाही, यापुढेही भविष्यात असा विक्रम होईल, याबाबत शंकाच आहे.  


टी20 विश्वचषकात न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी या संघाचं आव्हान संपुष्टात आलेय. त्यांच्यामध्ये आज अखेरचा साखळी सामना पार पडला. या सामन्यात गोलंदाजी करताना  न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने इतिहास रचला. फर्ग्युसनने 4 षटकांच्या स्पेलमध्ये एकही धाव खर्च न करता 3 विकेट घेतल्या. त्याने पापुआ न्यू गिनीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. लॉकी फर्ग्युसनच्या भेदक गोलंदाजीसमोर पापुआ न्यू गिनीचे फलंदाजांनी नांगी टाकली.   






कोणत्याही गोलंदाजाने टी20 क्रिकेटमध्ये आपल्या षटकांचा कोटा पूर्ण करणे आणि एकही धाव न देता विकेट घेणे हे आश्चर्यकारक आहे. पण, न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने आज हे काम करून दाखवलेय. पीएनजीविरुद्धच्या टी-20 विश्वचषक सामन्यात त्याने ही कामगिरी केली. विश्वचषक स्पर्धेत हे पहिल्यांदाच घडले आहे, तर आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये हे दुसऱ्यांदा हा रेकॉर्ड झालाय. 






 


त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्यातील सामना खेळला जात आहे. पावसामुळे हा सामना एक तास उशिराने सुरू झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर पापुआ न्यू गिनीचा संघ फक्त 78 धावांत गारज झाला. 20 षटकेही फलंदाजी करु शकले नाहीत. एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. तर तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या केली. यामध्ये नॉर्मन वनुआ 14, चॉर्ल्स अमीनी 17, सेसे बाऊ 12 हे तीन फलंदाजच दुहेरी धावसंख्या पार करु शकले. लॉकी फर्ग्युसनने आपल्या कोट्यातील 4  षटके निर्धाव टाकली. त्याने 3 बळी घेतले. अशी कामगिरी करणारा तो कसोटी खेळणारा राष्ट्रीय संघातील पहिला गोलंदाज ठरला आहे. फर्ग्युसनने चॅड सोपर (एक धाव), चार्ल्स अमिनी (17 धावा) आणि कर्णधार असद वाला (6 धावा) यांना बाद केले.