T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) पाकिस्तान संघाला सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे. मग तो खराब खेळाचा विषय असो किंवा खेळाडूंच्या फिटनेसचा. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. या खराब कामगिरीदरम्यान पाकिस्तानचा यष्टीरक्षक आझम खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यानंतर चाहत्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे.
आझम खान अमेरिकेत स्ट्रीट फूड खाताना दिसला-
आझम खानच्या फलंदाजीतील फ्लॉप आणि त्याच्या फिटनेसबाबत आधीच प्रश्न उपस्थित केले जात होते. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आझम भारताच्या पराभवानंतर न्यूयॉर्कमधील स्ट्रीट फूड स्टॉलवर बर्गर खाताना दिसत आहे. मात्र व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत स्पष्ट झालेलं नाही. मात्र या व्हिडीओनंतर चाहत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, आझम अमेरिकेविरुद्ध शून्यावर बाद झाला. यानंतर भारताविरुद्धच्या सामन्यातून त्याला वगळण्यात आले.
आझम खानला दाखवला बाहेरचा रस्ता-
2024 च्या टी 20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध टी20 मालिका खेळली होती. इंग्लंडने ही मालिका जिंकली होती. या मालिकेसाठी आझम खानची निवड करण्यात आली होती, मात्र त्याची कामगिरी निराशाजनक होती. तसेच अनेकवेळा त्याने विकेटकीपिंग करताना झेलही सोडले, ज्याची चाहत्यांनी खूप टीका केली. या कामगिरीनंतरही त्याला 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाचा भाग बनवण्यात आले, त्यानंतर पीसीबी टीकाकारांच्या निशाण्यावर आला. आझम खान यांचे वजन 110 किलो आहे. आता T20 विश्वचषक 2024 मध्ये अमेरिकेविरुद्ध फ्लॉप ठरल्यानंतर त्याला भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. त्यानंतर काल झालेल्या कॅनडाविरुद्धच्या सामन्यातून देखील त्याला वगळण्यात आले. त्याच्या जागी इमाद वसीमला संधी देण्यात आली.