PAK vs CAN न्यूयॉर्क : भारत आणि अमेरिकेकडून पराभव स्वीकारल्यानंतर अखेर पाकिस्तानला सूर गवसला आहे. पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅनडाला बाबर आझमनं फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कॅनडाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 106 धावांवर रोखलं. कॅनडाकडून अरोन जॉन्सननं 44 बॉलमध्ये 52 धावांची खेळी केली. त्यामुळं त्यांनी 106 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्ताननं मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमच्या फलंदाजीमुळं कॅनडानं दिलेलं आव्हान पार केलं.
कॅनडानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 106 धावा केल्या. कॅनडाकडून अरोन जॉन्सननं 4 चौकार आणि 4 षटकार मारत 52 धावांची खेळी केली. दुसरीकडे कॅनडाचा संघ विकेट गमावत होता. कॅनडाच्या 9 पैकी 6 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पाकिस्तानच्या सर्व गोलंदाजांनी 7 पेक्षा कमी इकोनॉमीनं धावा दिल्या. मोहम्मद अमीर आणि हॅरिस राऊफनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
कॅनडानं पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानपुढं विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांची भागिदारी महत्त्वाची ठरली. बाबर आझम 33 धावांवर बाद झाला. मोहम्मद रिझवाननं 53 धावा केल्या. मोहम्मद रिझवाननं नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. अखेर पाकिस्ताननं टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय मिळवला आहे.
पाकिस्तान अ गटात कितव्या स्थानावर
यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक गटात 5 संघ या प्रमाणं चार गट करण्यात आले आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयरलँड या संघांचा समावेश आहे. भारतानं पाकिस्तान आणि आयरलँडला पराभूत केल्यानं चांगल्या नेट रनरेटसह ते पहिल्या स्थानावर आहेत. अ गटात अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेनं कॅनडा आणि पाकिस्तानला पराभूत केलं आहे. पाकिस्ताननं आज पहिला विजय मिळवला. पाकिस्ताननं कॅनडाला 7 विकेटनं पराभूत केलं. कॅनडानं देखील आयरलँडला पराभूत करत एक विजय मिळवलेला आहे. त्यामुळं त्यांच्याकडे देखील पाकिस्तान प्रमाणं 2 गुण आहेत. मात्र, नेट रनरेट चांगलं असल्यानं पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे. तर, कॅनडा अ गटात चौथ्या स्थानावर आहे. आयरलँड पाचव्या स्थानावर आहे.
दरम्यान, चार गटातून प्रत्येकी दोन संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करणार आहेत. सुपर-8 मध्ये प्रवेश करणारे दोन संघ प्रत्येक गटातील पहिले दोन संघ असतील. पाकिस्तानला सुपर-8 मध्ये प्रवेश करायचा असल्यास अमेरिकेनं उर्वरित मॅचमध्ये पराभूत व्हावं लागेल आणि भारताला सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल.
संबंधित बातम्या :