T20 World Cup 2024: आयपीएलवर 4 जणं लक्ष ठेऊन, टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा; आयसीसीचाही अल्टिमेटम
T20 World Cup 2024: इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम 26 मे रोजी संपणार आहे. मात्र त्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 सुरू होणार आहे.
T20 World Cup 2024: सध्या क्रिकेट विश्वात IPL 2024 ची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम 26 मे रोजी संपणार आहे. मात्र त्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 सुरू होणार आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा 1 जून ते 29 जून या कालावधीत चालणार आहे, ज्यामध्ये जगभरातील 20 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. टी-20 फॉरमॅटमधील जागतिक क्रमवारीत भारताचा संघ अव्वल स्थानी आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयची निवड समिती 15 खेळाडूंची निवड करणार आहे. एप्रिल महिनाच्या शेवटच्या आठवड्यात आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
India's T20 World Cup Squad is set to be selected in April's last week. (PTI). pic.twitter.com/lW8nu9TYKZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 30, 2024
1 मे पूर्वी संघाची घोषणा करा-
आयसीसीने टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघांच्या घोषणेची तारीख निश्चित केली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 20 संघांना 1 मे पूर्वी घोषणा करण्याची सूचना दिली आहे. तसेच 25 मे पर्यंत प्रत्येक संघाला त्यांच्या संघात फक्त एकच बदल करण्याची मुभा देखील असणार आहे.
भारतीय संघ कधी जाहीर होणार?
पीटीआयनुसार, भारतीय संघाची निवड समिती आयपीएल 2024 चा पहिला टप्पा संपल्यानंतर 15 खेळाडूंचा संघ जाहीर करेल. तोपर्यंत निवडकर्त्यांना खेळाडूंच्या फॉर्मची कल्पना आली असेल. आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचू न शकलेल्या संघातून निवडलेले खेळाडू लवकरच अमेरिकेला रवाना होईल. गेल्या वर्षी डब्ल्यूटीसी फायनलसाठीही असेच काहीसे करण्यात आले होते.
4 सदस्यांची निवड समिती लक्ष ठेऊन-
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या इतर संघांप्रमाणे, 15 खेळाडूंच्या मुख्य संघाव्यतिरिक्त, भारतीय संघ काही राखीव खेळाडूंना देखील आपल्यासोबत ठेवेल, जेणेकरून कोणालाही दुखापत झाल्यास कोणतीही अडचण येणार नाही. पीटीआयनुसार, 4 सदस्यांची निवड समिती आयपीएल 2024 च्या सामन्यांवर सतत लक्ष ठेवून आहे. ते सामने थेट पाहण्यासाठी मैदानावरही पोहोचत आहेत.
पात्र ठरलेले 20 संघ...
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
गटवारी
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा