T20 World Cup 2024 Irfan Pathan: सध्या टी-20 विश्वचषक 2024 ची (T20 World Cup 2024) स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये सुरु आहे. या स्पर्धेत दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये उरलेल्या दोन उपांत्य फेरीच्या स्थानासाठी चुरस रंगली आहे. आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना होणार आहे. मात्र याचदरम्यान क्रीडाविश्वात खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. 


भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण सध्या टी-20 विश्वचषकात समालोचनाची भूमिका बजावत आहे. यादरम्यान इरफान पठाणचा मेकअप आर्टिस्ट फैयाज अन्सारीचा स्विमिंगपूलमध्ये पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फैयाज अन्सारीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनूसार तो इरफान पठाणसोबत वेस्ट इंडिजला गेला होता. इरफान पठाण फैयाजचा मृतदेह भारतात पाठवण्याचा खर्च करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


नेमकं काय घडलं?


मृत फैयाज अन्सारीचा चुलत भाऊ मोहम्मद अहमद यांनी सांगितले की, सध्या टी-20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज-अमेरिकेत खेळला जात आहे. या स्पर्धेतील सुपर एट वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जात आहेत. इरफान पठाण सामन्याच्या कॉमेंट्रीसाठी वेस्ट इंडिजमध्ये आहे. मेकअप आर्टिस्ट फैयाज अन्सारी यांनाही त्यांनी सोबत घेतले. फैयाजही पठाणसोबत वेस्ट इंडिजमध्ये उपस्थित होता. वेस्ट इंडिजकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी संध्याकाळी एका हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना फैयाजचा मृत्यू झाला.


कोण आहे फैयाज अन्सारी?


मिळालेल्या माहितीनुसार, मृत फैयाज अन्सारी हा मूळचा बिजनौरच्या नगीना तहसीलमधील मोहल्ला काझी सराय येथील रहिवासी होता. अनेक वर्षे तो मुंबईत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होता. तिथे त्याचे सलूनचे दुकान होते. दरम्यान, एक दिवस भारतीय क्रिकेटर इरफान पठाण त्याच्या सलूनमध्ये आला होता. त्यानंतर दोघांची ओळख झाली आणि इरफानने फैयाजला आपला मेकअप आर्टिस्ट बनवले. इरफाननेही तिला परदेशात सोबत नेण्यास सुरुवात केली.


आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना-


टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सामना होणार आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे महत्वाचे असणार आहे. तर भारताला देखील उपांत्य फेरीतील स्थान पक्कं करण्यासाठी सामना जिंकावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत संघात कोणताही बदल करणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघात एक-दोन बदल होण्याची शक्यता आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 31 वेळा आमने-सामने आला आहे. यामध्ये भारताने 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाला 11 सामन्यात विजय मिळवण्यात यश  आले आहे. एक सामना अनिर्णित राहिला. तर टी-20 विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे एकूण 5 सामने झाले. यामध्ये 4 सामने भारताने, तर 1 सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार?, भारत 2023 मधील वनडे विश्वचषकातील अंतिम सामन्याचा हिशोब चुकता करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024: अफगाणिस्तानने लोळवलं, पण घमंड उतरला नाही; ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने थेट टीम इंडियाला डिवचलं!


T20 World Cup 2024: ...अन् अफगाणिस्तान थेट विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहचेल; नेमकं समीकरण काय?, समजून घ्या!


T20 World Cup 2024 Team India: वेस्ट इंडिजचा संघ जर विश्वचषकात...; सर विवियन रिचर्ड्स आले, हसवले, मनातले सगळं बोलले, Video