T20 World Cup 2024 Ind vs Aus: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सामना होणार आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे महत्वाचे असणार आहे. तर भारताला देखील उपांत्य फेरीतील स्थान पक्कं करण्यासाठी सामना जिंकावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत संघात कोणताही बदल करणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघात एक-दोन बदल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरुद्ध 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता भारतीय संघाला पराभूत करणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसेल.
भारतीय संघाला हरवणे सोपे नाही...
टी-20 विश्वचषकात आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया 5 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाने 3 विजय मिळवले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 2 सामन्यात भारताचा पराभव केला आहे. 8 वर्षांपूर्वीच्या T20 विश्वचषकात दोन्ही संघ शेवटच्या वेळी आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियाने कांगारूंचा पराभव केला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. याशिवाय एकूण आकडेवारीवरून असे दिसून येते की, ऑस्ट्रेलियासाठी भारताला हरवणे नेहमीच कठीण गेले आहे. भारतीय संघाने टी-20 फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियावर आपला दबदबा कायम ठेवला आहे.
गुणतालिकेत भारत अव्वल-
आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 फॉरमॅटमध्ये 31 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारताने 19 वेळा ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे, तर टीम इंडियाला 11 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, मागील 6 टी-20 सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 5 वेळा पराभूत केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ग्रुप-1 मध्ये अव्वल स्थानावर आहे. भारताचे 2 सामन्यांत 4 गुण आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे समान 2-2 गुण आहेत, परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
ट्रेव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेश मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यूस वेड, पॅट कमिन्स, अश्टन अॅगर, अॅडम झाम्पा, जॉश हॅजलवूड
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर अन् टीम इंडियच्या सामन्याआधी मिचेल मार्श काय म्हणाला?
खेळपट्टी दोन्ही संघांसाठी चांगली नव्हती. हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. आजच्या सामन्यातील विजयाचे संपूर्ण श्रेय अफगाणिस्तान संघाला जाते. या पराभवातून लवकरच बाहेर पडायला आम्हाला आवडेल, असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श म्हणाला. तसेच भारतासोबतच्या सामन्याबद्दल तो म्हणाला, 'सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आम्हाला पुढचा सामना काहीही करुन जिंकायचा आहे आणि त्यासाठी आमच्यासाठी भारतापेक्षा चांगला संघ असू शकत नाही. ज्यांच्या विरोधात आम्हाला विजयाची नोंद करायची आहे, असं म्हणत मिचेल मार्शने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.