न्यूयॉर्क : भारत (India) आणि आयरलँड (Ireland) यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2024) आठवी मॅच पार पडली. भारतानं ही मॅच आठ विकेटनं जिंकली. भारताच्या गोलंदाजांनी आयरलँडला 96 धावांवर रोखलं. यानंतर रोहित शर्मा आणि रिषभ पंतनं दमदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. जसप्रीत बुमराहला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. रोहित शर्मानं टी-20 क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पार केला. तर, टी 20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मानं 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. भारताच्या विजयाबद्दल ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी थेट अमेरिकेतून एबीपी माझा सोबत संवाद साधला. यामध्ये त्यांनी भारतीय संघाच्या विजयाचं विश्लेषण केलं.
सुनंदन लेले यांनी स्पर्धा चालू होत असताना चांगली सुरुवात होणं फार गरजेचं असते ते भारतानं करुन दाखवलं आहे, असं म्हटलं. पहिली बॉलिंग करायचा जो फायदा उचलायचा होता त्या आठ विकेट फास्ट बॉलरनी घेतलेल्या आहेत, असं सुनंदन लेले म्हणाले. हार्दिक पांड्याला क्रिकेटनं गेल्या सहा महिन्यांमध्ये धोपटून काढलं होतं. त्याच क्रिकेटनं आज हार्दिक पांड्याला डोक्यावर घेतलं असं लेले यांनी म्हटलं.
चांगली बॅटिंग करण्यासाठी तंत्राची गरज : सुनंदन लेले
आयरलँडला सुरुवातीला कमी धावसंख्येत रोखता आलं नंतर बॅटिंग करुन दणदणीत विजय मिळवता आला. भारतासाठी हा प्रवास सुखकर राहिला आहे. अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपमध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करण्यासाठी तंत्राची गरज लागणार आहे.नुसतं पाय पुढं टाका फिरवा पंखा असं करता येणार नाही, असा इशारा सुनंदन लेले यांनी भारतीय फलंदाजांना दिला. भारतानं आजच्या मॅचमध्ये सर्व बॉक्सेस टीक केलेत त्याचा फायदा संघाला नक्की होईल, असं सुनंदन लेले म्हणाले.
आजच्या विजयातून काय शिकण्यासारखं याचा उहापोह भारतीय संघ व्यवस्थापनाला करावा लागेल.एक दिवस विश्रांती घेऊन चांगल्या सरावासाठी ते मैदानात उतरतील. भारतीय संघाला याची पूर्ण कल्पना आहे. आयरलँड विरुद्धच्या विजयानं फार हुरळून जायची गरज नाही. पुढचा सामना पाकिस्तान विरुद्ध आहे. जसा भारतीय मारा तिखट आहे, तसा पाकिस्तानचा सुद्धा आहे, असंही सुनंदन लेले यांनी म्हटलं.
त्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी करु शकणारा संघ जिंकणारा याची कल्पना रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांना आहे. त्याचीच तयारी केली जाणार आहे, असं सुनंदन लेले म्हणाले.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच 9 जून रोजी होणार आहे.
संबंधित बातम्या :