T20 World Cup 2024 Ind vs Pak: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) काल भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. यासह टी-20 विश्वचषकात भारताने सातव्यांदा पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताचा डाव 19 षटकांत 119 धावांत संपुष्टात आला. यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानला 20 षटकांत 7 बाद 113 धावांवर रोखले.
सामना कुठे फिरला?
पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित दिसत होता. बाबर आझमच्या संघाला 48 चेंडूत 48 धावा करायच्या होत्या, तर आठ विकेट्स पाकिस्तानच्या हातात होत्या. पण यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. त्यामुळे पाकिस्तानी संघ हा सामना 6 धावांनी हरला. हार्दिक पांड्या भारताकडून 13 वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकात हार्दिक पांड्याने महत्त्वाची विकेट घेतली ती म्हणजे फखार जमानची. फखार जमानच्या विकेट्सने पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. फखार जमान टी-20 मधील महत्वाचा फलंदाज होता. तसेच फखारने भारताविरुद्ध याआधी देखील चांगल्या धावा केल्या आहेत. पण हार्दिकने फखारची घेतलेली विकेट सामन्यातील टर्निग पॉइंट ठरला.
पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव-
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. 2007 च्या विश्वचषकात उभय संघांमध्ये पहिला सामना झाला होता. 2024 पूर्वी, दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 6 वेळा भारतीय संघ विजयी झाला होता. मात्र या विजयानंतर टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजय विक्रम 7-1 असा झाला आहे.
विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आमच्या डावात आम्ही चांगल्या स्थितीत होतो. मात्र आम्ही पुरेशी भागीदारी केली नाही आणि फलंदाजीत कमी पडलो. गेल्या सामन्याच्या तुलनेत चांगली विकेट होती. आम्ही जेव्हा फलंदाजी करुन गोलंदाजीसाठी मैदानात उतरलो तेव्हा आम्ही विचार केला की आपल्या विकेट्स जाऊ शकतात, तर त्यांच्या पण विकेट्स आपण घेऊ शकतो. प्रत्येकाकडून थोडेसे योगदान मोठे फरक करू शकते. बुमराह एक ताकदवान खेळाडू आहे. तो काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. संपूर्ण विश्वचषकामध्ये त्याने त्या मानसिकतेत राहावे, असं रोहित शर्मा म्हणाला. तसेच मैदानात गर्दी देखील चांगली होती. प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ही फक्त सुरुवात आहे, आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असं रोहित शर्माने सांगितले.
संबंधित बातम्या:
बुमाराहने मॅच कुठे फिरवली, कुणाची विकेट टर्निंग पॉइंट ठरली, पाहा सर्व थरार