T20 World Cup 2024 Ind vs Aus: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सामना होणार आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे महत्वाचे असणार आहे. तर भारताला देखील उपांत्य फेरीतील स्थान पक्कं करण्यासाठी सामना जिंकावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत संघात कोणताही बदल करणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघात एक-दोन बदल होण्याची शक्यता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 31 वेळा आमने-सामने आला आहे. यामध्ये भारताने 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाला 11 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. एक सामना अनिर्णित राहिला. तर टी-20 विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे एकूण 5 सामने झाले. यामध्ये 4 सामने भारताने, तर 1 सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार?, भारत 2023 मधील वनडे विश्वचषकातील अंतिम सामन्याचा हिशोब चुकता करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
ट्रेव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेश मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यूस वेड, पॅट कमिन्स, अश्टन अॅगर, अॅडम झाम्पा, जॉश हॅजलवूड
सामन्यावर पावसाचं सावट-
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यावर पावसाचं सावट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सामना रद्द झाल्यास ऑस्ट्रेलियाला याचा फटका बसू शकतो.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर-8 सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. आज या सामनादरम्यान पावासाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. पाऊस पडल्यास भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील षटकांची संख्या कमी होऊ शकते आणि सामना रद्द देखील होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सामना रद्द झाला तर फायदा कोणाला होणार?
भारताचे सध्या 4 गुण आहेत आणि संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे सध्या प्रत्येकी दोन गुण आहेत. जर भारत-ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल, ज्यामुळे भारताचे 5 गुण आणि ऑस्ट्रेलियाचे 3 गुण होतील. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय मिळवावा अशी प्रार्थना करेल, कारण अफगाणिस्तान संघ बांगलादेशला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर अन् टीम इंडियच्या सामन्याआधी मिचेल मार्श काय म्हणाला?
खेळपट्टी दोन्ही संघांसाठी चांगली नव्हती. हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. आजच्या सामन्यातील विजयाचे संपूर्ण श्रेय अफगाणिस्तान संघाला जाते. या पराभवातून लवकरच बाहेर पडायला आम्हाला आवडेल, असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श म्हणाला. तसेच भारतासोबतच्या सामन्याबद्दल तो म्हणाला, 'सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आम्हाला पुढचा सामना काहीही करुन जिंकायचा आहे आणि त्यासाठी आमच्यासाठी भारतापेक्षा चांगला संघ असू शकत नाही. ज्यांच्या विरोधात आम्हाला विजयाची नोंद करायची आहे, असं म्हणत मिचेल मार्शने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.