T20 World Cup 2024 Ind vs Aus: टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup 2024) सुपर-8 मधील स्पर्धा अधिक रोमांचक होत आहे. एकुण 8 संघांमधून आतापर्यंत एकच संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाला आहे, तो म्हणजे ग्रुप-2 मधील  इंग्लंड. भारत, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका या संघांमध्ये उपांत्य फेरीसाठी चुरस रंगली आहे. 


आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सामना होणार आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे महत्वाचे असणार आहे. तर भारताला देखील उपांत्य फेरीतील स्थान पक्कं करण्यासाठी सामना जिंकावा लागणार आहे. पण याचदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यावर पावसाचं सावट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सामना रद्द झाल्यास ऑस्ट्रेलियाला याचा फटका बसू शकतो.






भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट-


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर-8 सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये सेंट लुसियामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ढगांमध्ये विजांचा लखलखाटही दिसू लागल्याने हवामान खूपच खराब असल्याचे दिसून येत आहे. सेंट लुसियामध्ये पुढील आठवडाभर पावसाचा अंदाज आहे. आज सकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यास भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील षटकांची संख्या कमी होऊ शकते आणि सामना रद्द देखील होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


सामना रद्द झाला तर फायदा कोणाला होणार?


भारताचे सध्या 4 गुण आहेत आणि संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे सध्या प्रत्येकी दोन गुण आहेत. जर भारत-ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल, ज्यामुळे भारताचे 5 गुण आणि ऑस्ट्रेलियाचे 3 गुण होतील. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय मिळवावा अशी प्रार्थना करेल, कारण अफगाणिस्तान संघ बांगलादेशला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश करेल.


अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर अन् टीम इंडियच्या सामन्याआधी मिचेल मार्श काय म्हणाला?


खेळपट्टी दोन्ही संघांसाठी चांगली नव्हती. हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. आजच्या सामन्यातील विजयाचे संपूर्ण श्रेय अफगाणिस्तान संघाला जाते. या पराभवातून लवकरच बाहेर पडायला आम्हाला आवडेल, असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श म्हणाला. तसेच भारतासोबतच्या सामन्याबद्दल तो म्हणाला, 'सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आम्हाला पुढचा सामना काहीही करुन जिंकायचा आहे आणि त्यासाठी आमच्यासाठी भारतापेक्षा चांगला संघ असू शकत नाही. ज्यांच्या विरोधात आम्हाला विजयाची नोंद करायची आहे, असं म्हणत मिचेल मार्शने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024: अफगाणिस्तानने लोळवलं, पण घमंड उतरला नाही; ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने थेट टीम इंडियाला डिवचलं!


T20 World Cup 2024: ...अन् अफगाणिस्तान थेट विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहचेल; नेमकं समीकरण काय?, समजून घ्या!


T20 World Cup 2024 Team India: वेस्ट इंडिजचा संघ जर विश्वचषकात...; सर विवियन रिचर्ड्स आले, हसवले, मनातले सगळं बोलले, Video