(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PAK vs AUS : पाकिस्तानचा विजयरथ ऑस्ट्रेलिया रोखणार का? आज दुसरा उपांत्य सामना
PAK vs AUS, T20 World Cup 2021 : अजेय पाकिस्तान संघासमोर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान असणार आहे. साखळी फेरीत पाकिस्तान संघानं एकही पराभव स्विकारला नाही.
PAK vs AUS, T20 World Cup 2021 : बुधवारी टी-20 विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना झाला. या सामन्यात इंग्लंडचा पराभव करत न्यूझीलंड संघानं पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज, गुरुवारी टी20 विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये उपांत्य सामन्यात लढाई होणार आहे. अजेय पाकिस्तान संघासमोर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान असणार आहे. साखळी फेरीत पाकिस्तान संघानं एकही पराभव स्विकारला नाही. 2016 मध्ये साखळी फेरीत गारद होणाऱ्या पाकिस्तान संघानं यूएईत सुरु असलेल्या स्पर्धेत दमदार कामगिरी करत सर्वांनाच चकीत केलं आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या स्पर्धेत पराभव न स्वीकारणारा पाकिस्तान एकमेव संघ आहे. दुसरीकडे 2010 प्रमाणे ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत पाकिस्तानवर मात करणार का?
भारताचा 10 गड्यांनी पराभव करत पाकिस्तान संघानं दिमाखात विश्वचषकाची सुरुवात केली होती. त्यानंतर न्यूझीलंड, अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलँड यांच्यावर विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पटकावलं. ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीत परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. पण दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजला हरवून नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियानं टी20 विश्वचषकावर नाव कोरलं होतं, याची पुनारवृत्तीसाठी ऑस्ट्रेलियाही सज्ज आहे. मात्र, त्यांच्यासमोर पाकिस्तानचं आव्हान आहे.
ऑस्ट्रेलियाची भिस्त-
आयपीएलमध्ये धावांसाठी झगडणाऱ्या वॉर्नरला सूर गवसला आहे. ही ऑस्ट्रेलियासाठी जमेची बाजू आहे. कर्णधार फिंचही फॉर्मात आहे. मधल्या फळीत स्मिथ, मॅक्सवेल, स्टॉयनिस आणि मार्श आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत. कमिन्स, स्टार्क आणि हेजलवूड या वेगवान त्रिकुटाच्या फाऱ्याला अँडम झॅम्पा या फिरकीपटूची चांगली साथ मिळत आहे. शिवाय स्टॉयनिस, मॅक्सवेल आणि मार्शही गोलंदाजीत आपलं योगदान देत आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज अॅश्टन अगरचाही ऑस्ट्रेलियाकडे पर्याय उपलब्ध आहे.
पाकिस्तानची ताकद -
पाकिस्तानबाबत बोलायचं झाल्यास कर्णधार बाबर आझम आणि रिझवान यांच्या फलंदाजीवर भिस्त आहे. दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी पाकिस्तानच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. चार अर्धशतकासह या विश्वचषकात बाबरच्या नावावर सर्वाधिक धावा जमा आहेत. रिझवानकडून त्याला चांगली साथ मिळाली आहे. आसिफ अली, अनुभवी शोएब मलिक आणि मोहम्मद हाफीज यांच्यावर मधल्या फळीतील जबाबदारी असेल. हे खेळाडू एकहाती सामना फिरवू शकतात. फखर झमानला अद्याप सूर गवसलेला नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाविरोधात संधी मिळाल्यास मोठं योगदान देऊ शकतो. फलंदाजीप्रमाणेच पाकिस्तान संघाची गोलंदाजीही तगडी आहे. शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, हसन अली या वेगवान गोलंदाजांचा भरणा आहे. यांच्या जोडीला इमाद वसिम, हाफीज आणि शदाब खान या फिरकीपटूंची साथ आहे. गरज पडल्यास शोएब मलिकही आपल्या फिरकी मारा करु शकतो.
आकडे काय सांगतात?
ऑस्ट्रलिया आणि पाकसितान आतापर्यंत 23 टी20 सामन्यात आमनेसामने आले आहेत. यापैकी 13 सामन्यात पाकिस्तान संघानं बाजी मारली आहे. तर फक्त 9 सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आलेला आहे. एका सामन्यात निकाल लागला नव्हता. आकडे पाकिस्तान संघाच्या बाजूनं असले तरी उपांत्य सामन्यात विजय कसा मिळवयचा हे ऑस्ट्रेलियाला चांगलेच माहित आहेत. यंदा पाकिस्तानचा संघही फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे उपांत्य सामना रोमांचक होईल.