T20 Captain of Team India : भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव भारताच्या टी 20 संघाच्या कर्णधारपदाचा प्रमुख दावेदार म्हणून समोर आलाय. यापूर्वी हार्दिक पंड्याला उपकर्णधार पदावरुन कर्णधार केले जाईल, असे मानले जात होते. मात्र, कर्णधारपदाच्या रेसमध्ये सूर्यकुमार यादवने आघाडी घेतली असल्याचे बोलले जात आहे. पंड्या या महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या श्रीलंकेविरोधातील टी 20 मालिकेसाठी उपलब्ध आहे. मात्र, गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरोधातील 8 टी 20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची पसंती असल्याचे बोलले जात आहे. 


गौतम गंभीरची हार्दिक पंड्यासोबत चर्चा 


गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी आज (दि.16) संध्याकाळी हार्दिक पंड्यासोबत चर्चा केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. संघात स्थिरता ठेवण्यासाठी मोठ्या कालावधीसाठी चांगला पर्यायाचा विचार केला जाईल.  मागच्या महिन्यात वेस्टइंडिजमध्ये झालेला वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृ्त्ती घेतली. त्यानंतर भारतीय संघ अजूनही नव्या कर्णधाराचा शोध घेत आहे. टी 20 वर्ल्डकपमधील भारताच्या विजयात हार्दिक पांड्याने महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र, आता व्यक्तिगत कारणांमुळे हार्दिक पंड्या श्रीलंकेत खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विश्रांती घेत आहे. 


हार्दिक पंड्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताच्या टी-20 संघाचा उपकर्णधार होता


27 ते 30 जुलै दरम्यान पल्लेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध टी-20 सामने होणार आहेत. यानंतर 2 ते 7 ऑगस्ट दरम्यान कोलंबोमध्ये एकदिवसीय सामने खेळवले जातील. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठीचा संघ येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'हार्दिक पांड्या हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताच्या टी-20 संघाचा उपकर्णधार होता. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी त्यांच्याकडून संघाचे नेतृत्व करणे अपेक्षित होते. परंतु, सूर्यकुमार यादव केवळ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठीच नाही तर 2026 च्या विश्वचषकापर्यंत संभाव्य कर्णधार असेल.'


सूर्यकुमार यादववर गंभीरचा विश्वास 


23 वर्षीय सूर्यकुमार हा भारतीय ड्रेसिंग रुममधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक मानला जातो. कोलकाता नाईट रायडर्समध्ये गंभीरच्या नेतृत्वाखालीच त्याने टी-20 खेळाडू म्हणून आपली छाप सोडली होती. तत्कालीन कर्णधार म्हणजे गौतम गंभीरने त्याला पहिल्यांदा 'स्काय'म्हटले होते. रोहितनंतर हार्दिककडे भारताचा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. परंतु अनेक घटकांनी परिस्थिती बदलली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पांड्याची कामगिरी निराशाजनक आहे आणि निवड समितीतील सदस्यही त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याच्या मनस्थितीत नाहीत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Team India : भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला पाकिस्तानात जाणार की आशिया कपची रणनीती राबवणार? पीसीबीला गुडघे टेकायला लावणार?