Suryakumar Yadav Ind vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं टीम इंडियाला सूर्यकुमार यादवच्या रुपात नवा कर्णधार मिळाला आहे.


टीम इंडियाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर सूर्यकुमार यादवे पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत सूर्यकुमार यादवने सर्वांचे आभार मानले आहेत. तुमच्या प्रेम, समर्थन आणि शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. गेले काही आठवडे स्वप्नापेक्षा कमी नव्हते आणि मी खरोखर कृतज्ञ आहे. देशासाठी खेळणे ही सर्वात खास भावना आहे जी मी शब्दात सांगू शकणार नाही. या नवीन भूमिकेमुळे खूप जबाबदारी आणि उत्साह आहे मला तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत राहतील अशी आशा आहे, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. 






हार्दिक पांड्याला संधी का नाही? 


हार्दिक पांड्यानं संघ निवड जाहीर होण्यापूर्वी एकदिवसीय मालिकेतून वैयक्तिक कारणामुळं माघार घेतली होती. निवड समितीनं  2026 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं संघाची बांधणी करण्याचा विचार केला असावा त्यामुळं सूर्यकुमार यादवला नेतृत्त्व करण्याची संधी दिली गेली. हार्दिक पांड्याच्या दुखापतीचा मुद्दा विरोधात गेला असण्याची शक्यता आहे. गौतम गंभीरनं केकेआचा प्रशिक्षक असताना सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद दिलं होतं. आता गंभीरचं प्रशिक्षक झाल्यानं सूर्यकुमार यादवचं नाव वरचढ होतं. हार्दिक पांड्याचा फिटनेस हा सातत्यानं पाहायला मिळत नाही. हार्दिकला सातत्यानं विश्रांती घ्यावी लागते. कर्णधारानं संघाला प्रेरणा देण्यासाठी मैदानावर असणं आवश्यक असतं त्यामुळं ही संधी हार्दिकच्या हातून निसटली आहे.  हार्दिक पांड्याकडे श्रीलंका दौऱ्यात उपकर्णधारपद देखील असणार नाही. 


टी20 मालिकेसाठी टीम इंडिया - 


सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज


टी20 मालिकेचं वेळापत्रक- 


पहिली टी 20 मॅच : 27 जुलै
दुसरी टी 20 मॅच : 28 जुलै  
तिसरी टी 20 मॅच : 30 जुलै


संबंधित बातम्या:


हार्दिकने कोणतीही चुकीची गोष्ट केली नव्हती, गंभीरची वेगळी रणनीती असेल, पण...; मोहम्मद कैफ रोखठोक बोलला!


हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?