Womens Asia Cup T20 2024 : महिला आशिया चषक स्पर्धेत हरमनप्रीतच्या भारतीय संघाने विजयी सुरुवात केली. भारतीय संघाने पाकिस्तानचा सात विकेटने दारुण पराभव केला. भारताकडून स्मृती मंधाना, दिप्ती शर्मा यांनी चमकदार कामगिरी केली. भेदक मारा करणाऱ्या दिप्ती शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पाकिस्तानचा पराभव करत भारतीय महिला संघाने आशिया चषकाची विजयी सुरुवात केली. टीम इंडियाचा पुढचा सामना रविवारी संयुक्त अरब अमिरातीसोबत आहे.  


आजपासून श्रीलंकामध्ये महिला आशिया चषक स्पर्धेतला सुरूवात झाली. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा सात विकेटने पराभव करत दणक्यात सुरुवात केली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण दिप्ती शर्माच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा संघ फक्त 108 धावांत गारद झाला. भारतीय संघाने हे आव्हान 14.1 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी शानदार फलंदाजी केली. स्मृतीने 45 तर दिप्तीने 40 धावांची खेळी केली.  


स्मृती-शेफालीची आक्रमक सुरुवात - 


पाकिस्तानने दिलेल्या 109 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. सलामी फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली.  9.3 षटकांत या दोघांनी 85 धावांची सलामी दिली. स्मृती मंधाना हिने 31 चेंडूमध्ये 45 धावांची खेळी केली. यामध्ये 9 चौकारांचा समावेश होता. तर शेफाली वर्मा हिने 29 चेंडूमध्ये एक षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 40 धावांचे महत्वाचे योगदान दिले. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या दोघांनी पहिल्या दहा षटकांमध्येच सामना भारताच्या बाजूने फिरवला होता.  पाकिस्तानकडून सय्यदा अरुब शाहने सर्वाधिक दोन बळी घेतले. 


पाकिस्तानचा डाव फक्त 108 धावांत संपुष्टात - 


पाकिस्तानची कर्णधार निदा दार हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संपूर्ण संघाने 19.2 षटकांत केवळ 108 धावा केल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर सिद्रा अमीन आणि फातिमा सना यांनी सर्वाधिक 25 धावा केल्या. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.