(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suryakumar Yadav Record : सूर्यादादा कोहली आणि बाबरचा 'विराट' विक्रम मोडणार? ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी
Suryakumar Yadav : टी-20 क्रिकेटमधील टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवकडे विराट कोहली आणि बाबर आझमचा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे.
Suryakumar Yadav : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठीचा टीम इंडियाचा (Team India) नवा कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट रँकिंगमधील सध्याचा अव्वल फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला आगामी मालिकेत नवा विक्रम रचण्याची संधी आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) विक्रम मोडण्यापासून सूर्यकुमार काही पावले दूर आहे. सूर्यकुमार हा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट मध्ये सर्वात जलद 2000 हजार धावा करणारा फलंदाज बनू शकतो.
विक्रम मोडणे सोपं नाही!
मात्र, हा विक्रम मोडणे सूर्यासाठी इतके सोपे नसेल कारण या विक्रमावर आपले नाव कोरण्यासाठी त्याला पुढील डावात 159 धावांची गरज आहे. पुढच्या डावात त्याने 159 धावा केल्या तर तो बाबर आझमचा विक्रम मोडेल. सूर्याने पुढच्या दोन डावात 159 धावा केल्या तर तो बाबर आझम आणि पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांच्याशी बरोबरी करेल. बाबर आणि रिझवानने टी-20 च्या 52 डावांमध्ये 2000 धावांचा टप्पा गाठला होता.
सूर्याने पुढील पाच टी-20 आंतरराष्ट्रीय डावांत 159 धावा केल्या तर तो विराट कोहलीचा विक्रम मोडेल. कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा 56 डावात पार केला.
त्यामुळे आता आगामी मालिकेत सूर्यकुमार कोणत्या फलंदाजाचा विक्रम मोडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आतापर्यंत, सूर्यकुमारने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 50 डावांमध्ये 46.02 च्या सरासरीने आणि 172.70 च्या स्ट्राइक रेटने 1841 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 3 शतके आणि 15 अर्धशतके केली आहेत.
पहिल्यांदाच सांभाळणार टीम इंडियाची सूत्रे
सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. हार्दिक पांड्याने 2023 मध्ये भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याच्या दुखापतीमुळे कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमारवर सोपवण्यात आली आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाडला संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यात उपकर्णधार म्हणून संघात सहभागी होणार आहे.