Abu Dhabi T10 League: भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू सुरेश रैनानं (Suresh Raina) 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यानंतर त्यानं देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएललाही अलविदा केला. सध्या तो अबूधाबीच्या टी-10 लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सकडून खेळत आहे. या लीगमधील नववा सामना डेक्कन ग्लॅडिएटर्स आणि न्यूयॉर्क स्ट्रायकर्स (Deccan Gladiators vs New York Strikers) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सुरेश रैना त्याच्या जुन्या अंदाजात फलंदाजी करताना दिसला. 


न्यूयॉर्क स्ट्रायकर्सविरुद्ध सामन्यात सुरेश रैनानं 19 चेंडूत 28 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि 1 षटकार आहे. रैनामुळेच संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. निवृत्तीनंतरही सुरेश रैनाच्या बॅटला तीच धार असल्याचं पाहायला मिळालं. 


पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद
अबू धाबी टी10 लीगमधील पदार्पणाच्या सामन्यात सुरेश रैनाला आपला अप्रतिम खेळ दाखवू शकला नाही. त्याच्या पहिल्याच सामन्यात तो शून्यावर बाद झाला. त्याला ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज अँड्र्यू टायनं आपल्या जाळ्यात अडकवलं. सुरेश रैना 35 वर्षांचा आहे. पण अजूनही सुरेश रैनाची गणना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते.


सुरैश रैनाची कारकिर्द
सुरेश रैना तिन्ही फॉरमेटमध्ये भारतासाठी क्रिकेट खेळला आहे. त्यानं 18 कसोटी, 226 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 768 धावा केल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 5 हजार 614 धावांची नोंद आहे. याशिवाय टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून 1 हजार 605 धावा निघाल्या आहेत. 


मिस्टर आयपीएल
रैना खेळपट्टीवर मारक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सुरेश रैनाने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्जसाठीही त्यानं अनेक सामने जिंकले आहेत. त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या आयपीएलमधील 4 विजेतेपदांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. सुरेश रैनाच्या शानदार कामगिरीमुळं त्याला मिस्टर आयपीएल म्हटलं जातं.


रैना-धोनीची मैत्री
सुरेश रैनाला टी-20 क्रिकेटचा बादशाह मानला जातं. त्यानं टी-20 मध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करणारा रैना हा पहिला फलंदाज आहे.धोनी आणि सुरेश रैना यांच्यात सुरुवातीपासूनच चांगली मैत्री होती. विशेष म्हणजे, धोनीच्या निवृत्तीच्या काही क्षणातच सुरेश रैनानंही आंतराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. 


हे देखील वाचा-