Sri Lanka A vs Afghanistan A, Final: अफगाणिस्तानने इमर्जिंग टीम्स आशिया चषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. अफगाणिस्तानने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. याआधी अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत भारताचा पराभव करून मोठा धक्का दिला होता. आता अफगाणिस्तानने अंतिम फेरीत श्रीलंकेला पराभूत करून प्रथमच आशिया चषक पटकावत इतिहास नोंदवला आहे.






अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 134 धावांचे लक्ष्य होते. अफगाणिस्तान संघाने 18.1 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. अफगाणिस्तानसाठी सलामीवीर सेदिकुल्लाह अटलने 55 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. सेदिकुल्लाह अटलने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावले. तर करीम जन्नतने 27 चेंडूत 33 धावा केल्या. त्याने आपल्या डावात 3 षटकार टोलावले. दरविश रसूलीने 20 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. तर मोहम्मद इशाक 6 चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिला. मात्र, याआधी अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. अफगाणिस्तानचा सलामीवीर झुबैद अकबरी एकही धाव न करता बाद झाला, पण त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी डाव सांभाळला.






श्रीलंकेकडून सहान अरसिंघे, दुशान हेमंथा आणि इशान मलिंगाने प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या. याशिवाय श्रीलंकेच्या इतर गोलंदाजांना यश मिळाले नाही. तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने 20 षटकांत 7 बाद 133 धावा केल्या. श्रीलंकेसाठी सहान अरसिंघेने 47 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार मारले. तर निमेश विमुखीने 19 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. पवन रत्नायकेने 21 चेंडूत 20 धावांची खेळी खेळली, याशिवाय श्रीलंकेच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. तर अफगाणिस्तानकडून बिलाल सामी हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. बिलाल सामीने 4 षटकात 22 धावा देत 3 फलंदाजांना माघारी पाठवले. याशिवाय अल्लाह गझनफरने 2 फलंदाजांना बाद केले.


अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत भारताचा केला होता पराभव-


इमर्जिंग टीम्स आशिया चषकात अफगाणिस्तान क्रिकेट संघाने भारताचा पराभव केला आहे. अफगाणिस्तान आणि भारत उपांत्य फेरीचा सामना खेळण्यात आला. या सामन्यात अफगाणिस्तानने भारताचा 20 धावांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. या पराभवामुळे भारताला चांगलाच धक्का बसला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम खेळताना 206 धावांची मोठी मजल मारली होती. मात्र प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 186 धावाच करू शकला. रमणदीप सिंगने शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके मारत 64 धावांची तुफानी खेळी खेळली, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.


संबंधित बातमी:


Salman Ali Agha Vice-Captain Pakistan : पाकिस्तानी काही करू शकतात! एकही टी-20 न खेळलेल्या खेळाडूला बनवलं उपकर्णधार